Ticker

6/recent/ticker-posts

विजयदुर्ग गढी व माहीती

एखादा किल्ला मनापासून भावला की, त्या किल्ल्याविषयीचे आपले आकर्षण आणि उत्सुकता वाढत जाते. किल्ल्याची रचना, स्थापत्य, बांधणी. त्याचे तट-बुरूज, वाडे-हुडे, आणि किल्ल्याच्या प्रत्येक अंग प्रत्ययांविषयीची जवळीकता वाढल्याने त्याची पुर्वावस्था कशी असावी याचे एक कल्पनाचित्र अनेकदा आपल्या नजरेसमोर येत राहते.
विजयदुर्ग. शिवछत्रपतींच्या आरमारी महत्वकांक्षेतला आणि कोकण किनारपट्टीवरच्या बलदंड जलदुर्गांच्या साखळीत वसलेला एक बलाढ्य, बलदंड आणि तितकाच पोलादी किल्ला. विजयदुर्गच्या ताकदवर आणि खणखणीत तटा-बुरूजांची सर आजही कित्येक किल्ल्यांना नाही. इथले आखिव-रेखिव तट, वैशिष्ट्यपूर्ण आणि तितक्याच बुलंद बांधणीचे बुरूज, आजही फक्त छप्पर उडालेल्या आणि पुर्णपणे शाबूत असणा-या वास्तू , किल्ल्याची अतिशय कल्पक आणि तितकीच ताकदवर अशी स्थापत्यरचना विजयदुर्ग किल्ल्याचे स्थान शिवछत्रपतींच्या आरमाराचा एक खणखणीत आणि पोलादी पहारेकरी म्हणूनच अढळ करते.

महाराजांची आरमारी महत्वकांक्षा,जलदुर्गांवरच प्रेम या सर्वांचा समुच्चय कोकण किनारपट्टीवरील हरएक जलदुर्गांच्या तटाबुरूजांत मोठी उर्जा बनूनच सामावला आहे. विजयदुर्ग ही देखील त्यातलीच एक अच्युत बाब.

विजयदुर्गच्या तिहेरी तटाबद्दल आणि त्याच्या एकूण रचनेबद्दल  नेहमीच एक वेगळी ओढ आणि उत्सुकता होती. चार-दोन वर्षांपूर्वी जेव्हा विजयदुर्गला पहिल्यांदा भेट दिली तेव्हा विजयदुर्ग फक्त पाहिला होता. समजला नव्हता. यावेळी मात्र विजयदुर्ग च्या तिहेरी तटाची,अनोख्या प्रवेशव्दारांची, तितक्याच कल्पक बुरूजांची आणि एकंदरीतच पडकोट व बालेकिल्ला अशा पुर्णत विजयदुर्ग किल्ल्याची अनोखी आणि स्थापत्यशास्त्रातील एका उच्च पातळीवरची रचना ब-याचअंशी ध्यानात आली, थोडीथोडकी समजली,उमजली आणि विजयदुर्ग अधिकच आवडीचा विषय बनला.तीच गोष्ट कागदावर उतरविण्याचा हा प्रयत्न..

विजयदुर्गचे महत्त्वपूर्ण अंग असलेला बाह्य तिहेरी तट आज ब-यापैकी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणी नैसर्गिक तर काही ठिकाणी मानवी आक्रमणांनी किल्ल्याच्या या तटातील अनेक गोष्टी आज नामशेष झाल्या आहेत. नकाशात उल्लेख केलेले तिथलेच काही महत्वपूर्ण बुरूज आज प्रत्यक्षात त्या जागेवर अस्तित्वात नाहीत.

➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments