पानओवा व ओवा/
गुणाने कीती वर्णावा//
(यवानि अर्थात ओवा व पानांचा ओवा pletrathus amboinicus यात खुप फरक आहे.पानांचा ओवा हा तुळसी कुळातील. दोघांचेही गुण आज बघूया.)
लहानपणी घरी आम्ही पानदान बघायचो .
पाहुणे आले की गुळपाणी कींवा गुळाचा चहा दिला की पानदान समोर करायच बडीशेप, ओवा, पान ,काथ चुना ,चिकन सुपारी,लवंग विलायची असे अनेक पदार्थ त्यात असायचे.
आम्ही जाता येता बडीशेप, ओवा, विलायची संपवायचो .
शेवटि आईला ते लपवाव लागत होत. मग पाहुणे आले की त्या डब्ब्यावर आमचा हक्क असायचा .
कालांतराने हे सर्व आरोग्यदायी बंद झाल .
पाहुण्यांचे स्वागताला साखरेचा चहा, कोल्ड्रींग्स आले .
तरुण पणाचे अगोदर कधीही आम्हाला कोल्ड्रिंग्स ची चव माहिती पडली नाही.
आज लहान मुलांचे हाती या कोल्ड्रींग दिसतात .
खेडोपाडी पाहुण्यांचे स्वागत तंबाखू हातात देउन व्हायला लागले तेव्हाच खेड्यात आरोग्याची हमी संपली.
मी शेतीकडे जांतांना आदराने गुळपाणी , गुळाचा चहा प्यायला मीळायचा तिथे श्रींमतीचा थाट म्हणून चहात साखर आली तिथहि आरोग्याची हमी कमी होत गेली.
या लहानसहान गोष्टीतुन आरोग्य निरोगी राहाव म्हणून पुर्वजांनी घालून दिलेल्या सवई मोडण्यात प्रतिष्ठित लोकांचा फार सहभाग आहे.
विशिष्ट व्यक्तीचे किंवा समाजघटकाचे जीवनमान कितपत सुखकर आहे याचे मापन; जीवनमान, राहणीमान.हे समाजमनावर लादण्यात आल. त्यातुनच पार्ट्या ,कोल्ड्रींग्स ,छानछोकीपणा अश्या गोष्टि वाढल्या अस माझ मत.
स्डॕन्डर्ड सोसायटिचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या पुर्वजांनी दिलेल्या ज्ञानाचे अनुकरण जास्त सुखाचे राहते.
गुळाचा चहा ,गुळपाणी गरीबाचा व साखर चहा म्हणजे श्रींमती हे लहानपणी आमच्या मनावर बिंबल मग साखर चहाच चालू झाला .
आज साखरेपेक्षा गुळाला महत्त्व आल अगदि तसच हळूहळू जनता पारंपारिकतेकडे वळत आहे .हि अभिमानाची बाब आहे.
चला आज पानदानातील व आजीच्या बटव्यातील ओवा संबंधित माहिती बघू या.
ओवा
सं . - यवानी
हिं . - अजवान .
ई.- Bishops weed seed बिशप्स वीड सीड .
लॅ.- Carum copticum कोरम कोपटिकम् .
ओंवा बागाइतात होतो . याची झाडे सुमारे हात दीड हात उंच वाढतात . ओंवा प्रसिद्ध आहे . याचा औषधांत पुष्कळ उपयोग होतो . ओव्यांतून एक सत्व काढितात , त्यास ओंव्याचे फूल असे म्हणतात .
हे उजैन येथे खुप मोठ्या प्रमाणात काढितात .
ओंवा - तिखट , कडू , रुचिकर , उष्ण , अग्निदीपक , पाचक , पित्तकर , तीक्ष्ण , लघु , हृद्य , सारक , वृष्य , असा आहे ; व वातार्श , कफ , आध्मान , वांती , कृमि , शुक्रदोष , उदर , अनाह , हृद्रोग , प्लीहा , गुल्म , व आमवात यावार उपयोगी
( १ ) पोटदुखी , नळ , खोकला , अजीर्णावर- ओंवा खाऊन वर ऊन पाण्याचा घोट घ्यावा .
( २ ) शीतपित्तावर- गूळ आणि ओंवा खावा .
( ३ ) पडसे व मस्तकशूळावर- ओंव्याचे चूर्ण करून ते वस्त्रांत बांधून हुंगण्यास द्यावें , अथवा ओंव्याची विडी करून ओढावी .
( ४ ) बहुमूत्रावर- ओंवा व तीळ एकत्र करून द्यावे . ( ५ ) अपचीवर- ओंवा साखरेशी द्यावा .
( ६ ) खोकला , कास , कफज्वर , यांवर- ओवा , पिंपळी , अडुळसा व खसखशीची बोंडे यांचा काढा द्यावा .
( ७ ) कफ सुकल्यावर- ओंव्याचे चूर्ण व बिडलोण ताकांत घालून द्यावें .
धर्मः- ओव्यांत मिरची किंवा मोहरीचा तिखटपणा , चिरायताचा कडूपणा आणि हिंगाचा संकोच - विकास प्रतिबंधकपणा हे धर्म एकवट आहेत . सर्व किळसवाण्या द्रव्यांची रुचि लपविण्यास ओव्यांसारखे दुसरें औषध नाही . ओंवा दीपनपाचन , उष्ण उत्तम वायुनाशी , संकोच - विकासप्रतिबंधक मूल्यवान् उत्तेजक , बल्य , कोथप्रशमन , दुर्गंधिनाशक , व्रणरोपण , उत्तेजक श्लेष्महर गर्भाशयास उत्तेजक , ज्वरहर आणि कृमिघ्न आहे .
मात्राः -१ ते ३ तोळा .
ओंवा सैंधव आणि गरम पाण्याबरोबर देतात .
हा उकडूं नये . कारण त्यातील उपयुक्त तेल उडून जाते .
उपयोग -ओवा बाळंतिणीस देतात . ही रीत अगदी शास्त्रशुद्ध आहे . ह्याने तिला भूक लागते , अन्न पचतें ,
वारसरतो , कटींतील पीडा कमी होते . आणि विटाळ साफ पडतो .. बाळंतपणांत ओव्यासारखा अजमोदा वापरण्याचा प्रघात आहे . अजमोद्यापेक्षां ओवा जास्त जोरावर आहे .
बाळंत झाल्याबरोबर ओव्याची पुरचुंडी योनीत ठेवितात व बाळंतपणात जननेन्द्रिय ओव्याचे पाण्याने धुतात . आणि ओंव्याची धुरी देतात .
हिवतापांत ओंव्याने हिंवाचा जोर कमी होतो . व ताप भरल्यानंतर जलदी घाम सुटतो . शिवाय ज्वर उतरल्यानंतर येणारा थकवा कमी भासतो .
सूतिकाज्वरांत ओंवा फार हितावह आहे .
फुप्फुसाच्या रोगांत ओव्याने पुष्कळ कफ उत्पन्न होण्याचे कमी होते , कफ ढिला होतो व तो जलदी पडतो आणि घुमसट कमी होते . दम्यांत ओंव्याचे चूर्ण गरम पाण्याबरोबर देतात . किंवा ओंवा चिलमीतून ओढतात . घशाच्या शोथांत आणि शिथिलतेंत ओव्याची विडी ओढतात . ओव्याने कफांतील दुर्गेधि व सूक्ष्म रोगजंतु कमी होतात .
फुप्फुसाचे जीर्ण रोगांत हा सर्व प्रकारे हितकारक आहे . उलटी , कुपचन , अजीर्ण , पोटफुगी , पोटशूल या रोगांत ओवा गुणदायक आहे . महामारीचे हे खास औषध जरी नाही तरी ह्याने पुष्कळ फायदा होतो .
ओव्याच्या फुलाने पोटांतील आकडयाच्या आकाराचे जंत मरतात . दारुड्यास दारु पिण्याची तलब आली म्हणजे ओंवा चावण्यास देतात . त्याने मन जरा घट्ट केल्यास दारूची संवय सहज सुटते .
लहान मुलांच्या रोगांत यवानी पाणीय देतात .
ओव्याचे फूल - फार उत्तम कोथप्रशमन , जंतुघ्न आणि दुर्गंधिनाशक आहे .
कोथप्रशमन गणांतील सर्व औषधांत हे फार सुखावह आहे . काही औषधे रक्तांत मिसळून मूत्रपिंडाचा दाह उत्पन्न करितात .
तसें ह्याने होत नाही .
काही व्रणांवर येणारी कोमल त्वचा व सभोवतालची त्वचा ह्यास इजा करतात तसे ह्याने होत नाही . यानें पू उत्पन्न होण्याचे कमी होते . हे उकळलेल्या पाण्यात मिसळून त्याने जखम , व्रण , नासूर , भगंदर वगैरे जखमा धुतात .
ओव्याचे फूल ते १ गुंज प्रमाणाने पोटांत देतात . ह्याने आंतड्यांत जंतुवृद्धि होत नाही .
ओंवापान --
ओव्यांत पुष्कळ भेद आहेत .
ज्या झाडावर बी येत नाही , त्यास पानओवा म्हणतात . याचे झाड पसरट असून हात दीड हात उंच वाढते . याची पाने जाड असतात . या पानांस ओंव्याप्रमाणे वास येतो . यावर फळ किंवा बी येत नाही . या पानाची भजी फार सुरेख होतात .
पानओवा म्हणून एक छोटे झुडूप असते. याची पाने गोलाकार, मांसल अशी असतात. या पानांना ओव्याचा वास येतो म्हणून या झुडपाला पानओवा असे म्हणतात. याच्या पानांची भजी सुरेख लागतात. काही प्रांतांमध्ये याची भाजीसुद्धा केली जाते. याचे औषधी उपयोग पाहता पानओव्याचे झाड कुंडी, परसबागेत लावणे चांगले होय. याची छोटी फांदी पावसाळ्यात जमिनीत लावली तर त्यापासून बघता बघता नवीन झाड तयार होते.
गुदभागी कंड येणे, त्या ठिकाणी कायम ओलसरपणा जाणवणे, भूक कधी लागणे कधी न लागणे ही लक्षणे पोटात जंत असल्याचे होत. यावर पानओव्याच्या पानांचा रस घेण्याचा उपयोग होतो.
दोन चमचे रसात दोन चिमूट हळद, दोन चमचे धणे, चवीनुसार काळे मीठ मिसळून घेणे चांगले.
जेवणानंतर पोटात जडपणा जाणवणे, डोळ्यांवर झापड येणे, ढेकर येत राहणे, छातीत अस्वस्थ वाटत राहणे वगैरे तक्रारींवर जेवणानंतर पानओव्याची दोन पाने चावून खाण्याने बरे वाटते.
भूक लागत नसली, तोंडाला चव नसली तर जेवणाच्या सुरुवातीला पानओवा, कडुनिंब, आले, काळी मिरी, लिंबू, सैंधव एकत्र करून बनविलेली चटणी अर्धा चमचा प्रमाणात खाण्याने व जेवतानाही अधून मधून खाण्याने लगेच गुण येतो.
जिभेवर पांढरा थर साठणे, अन्नाची चव व्यवस्थित न लागणे, तोंडात चिकटपणा जाणवणे वगैरे तक्रारींवर पानओव्याचे पान चावावे व सुटलेली लाळ थुंकून टाकावी. याने वरील तक्रारी कमी होतात.
सूप बनविताना ओव्याची एक-दोन पाने ठेचून टाकण्याने ते अधिक रुचकर बनते व पचण्यासही हलके बनते.
वारंवार सर्दी-खोकला होणाऱ्यांनी अधून मधून ओव्याच्या पानांचा आहारात समावेश करणे चांगले.
( १ ) जंतावर- याच्या पानांचा रस काढून पाजावा .
( २ ) नानेटीचा ( या सापाच्या लाळेत विष असते . लहान प्राण्यांवर या विषाचे घातक परिणाम होतात ; परंतु माणसाला याच्या दंशामुळे फारशी विषबाधा होत नाही .)तरिही दंश झाल्यास याची पाने चुरून दंशस्थानी चोळावी , म्हणजे जरा चटका बसल्या सारखें होऊन वेग त्वरित बंद होतात .
पानओवा भजी.....
पानांचा ओवा या वनस्पतीची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत . देठे काढावीत . हरभऱ्याच्या डाळीचे पीठ ( बेसन ) घ्यावे . त्यात तिखट , मीठ , हिंग , हळद घालावे . कडकडीत तेलाचे मोहन घालावे व पाणी घालून फार घट्ट नाही , फार पातळ नाही असे पीठ भिजवावे . थोडा खाण्याचा सोडा घालून पीठ नीट मीक्स करावे. नंतर या पिठात पाने घालून भजी तेलात तळून घ्यावी . भजी कुरकुरीत होण्यासाठी त्यात थोडे तांदळाचे , ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घालावे . भजी ताजी असतांनाच खावी .
संदर्भ -वनऔषधीगुणादर्श,
औषधी संग्रह,
दै.सकाळ मधील माहिती.
टिप-
माहिती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.
या लेखनाचे लेखक लालील डाॅक्टर आहेत.
डाॕ.लिलाधर देवराव उगले
पन्नासवर्ष अविरत होमीओपॕथी सेवा.
डाॕ.कैलास लिलाधर उगले
पंचवीस वर्षे आयुर्वेद हर्बल संशोधनात्मक उत्पादन व अॕक्युंपंक्चर सेवा.
कु.कीर्ती कैलास उगले
student of B.A.M.S.
#Dr_Kailash_Ugale_Shree_Vitthal_Herbals_Pandharpur
0 Comments