बारव स्थापत्य :- भाग दोन
कुंड हा मुळात या वास्तुप्रकाराचा आधारभूत घटक ठरतो. या कुं डाच्या वर विशिष्ट पायऱ्या ठेऊन एक पटांगण-सोपान (टप्पा) ठेवतात. त्यानंतर दुसरा व तिसरा सोपान ठेऊन झालेला विस्तार बारव स्थापत्यात पहावयास मिळतो. थोडक्यात, एकात एक लहान होत जाणारे कुंड असे याचे स्वरूप असतं. बारवेत विविध देवतांची स्थापना केली जाते. त्यासाठी असलेली देवकोष्ठे सर्वात वरच्या सोपानावर स्वतंत्र अशी किंवा अगदी संरक्षक भिंतीत आणि प्रवेश मार्गाच्या दोन्ही बाजूंना ठेवतात. बारवेत प्रामुख्याने चौरस आकार आढळतो. आयत व क्वचित् अष्टकोनी आकार पहावयास मिळतात. बारवेस एक ते चार मुख-प्रवेश असतात.
श्री. भुवनदेव यांनी लिहिलेल्या "अपराजितपृच्छा" (सन 1175 ते 1250) या ग्रंथात "वापीकूपतडागादिनिर्णयोनाम" या मथळ्याचे प्रकरण आहे. ह्यात विश्वकर्मा आणि त्याचा नातू अपराजित ह्याच्या मध्ये वास्तनिर्मिती ह्यावर संभाषणे आहेत. यात म्हटल्याप्रमाणे नगराच्या बाहेर व आत निरनिराळ्या प्रकारचे जलाशय असावेत. विहीर, वापी हे कूपाचे प्रकार होत. कुंड म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नानासाठी बांधलेले मोठ्या आकाराचे पण उथळ हौद होत. कूपाचे दहा, वापीचे चार, कुंडाचे चार व तडागाचे सहा प्रकार या ग्रंथात दिले आहेत.
1) नन्दा भद्रा जया चैव चतुर्थी विजया तथा ।
एकवक्त्रा त्रिकूटा च नन्दा नाम वरप्रदा ॥ 9 ॥
अर्थ:- वापी किंवा बारव चे चार प्रकार आहेत - (१) नंदा (२) भद्रा (३) जया (४) विजया
यापैकी 'नंदा' वापी एकमुखी आहे आणि तीन बाजूंनी बंद आहे. मुख म्हणजे विहिरीच्या पाण्याच्या तळापर्यंत जाण्यासाठी विहरीला असलेला प्रवेशमार्ग. कूट म्हणजे चौरस खोली, मंडप किंवा माड होय. हे चौरस किंवा आयताकृती असतात. अशाप्रकारे नंदा नावाचे वापी हे नावानुसार वरदान आहे.
1) द्विवक्त्रा च षट्कूटा भद्रा नाम सुशोभिता त्रिवक्त्रा नवकूटा च जया वै देवदुर्लभा ॥ 10 ॥
अर्थ:-"भद्रा" नावाच्या दुसऱ्या वापीला दोन मुख आहेत, म्हणजे त्यात दोन बाजूंनी प्रवेश आहे, त्यांना सहा कूट आहे, अशा प्रकारे भद्रा सजवली आहे.
"जया" नावाच्या तिसऱ्या वापीला तीन मुख आहेत, आणि नऊ कूट आहेत. हे खूप चांगले आहे. अशी वापी देवतांना सुद्धा दुर्मिळ मानली जाते.
3) चतुर्वक्त्रा सूर्यकूटा विजया सर्वतोमुखी II
अर्थ:-विजया नावाच्या चौथ्या वर्णाच्या वापीलाचार मुख आणि बारा कूट आहेत.
बारव स्थापत्यामध्ये विविध आकार व प्रकार आढळतात. तसेच बारवेत कूट किंवा मंडप पण दिसतात. लोकभाषेत अशा बारवांना 'माड' म्हणतात. बारवेची पुढील अवस्था म्हणजे कूट, सज्जायुक्त मंडप होय. हे चौरस आकारातील बहुतांश आयताकार असतात. बारवात जसे एक ते चार प्रवेशद्वार आढळतात तसेच आजूबाजूला सर्व वाजून विकसित झालेला मंडप आढळतो. महानुभाव साहित्यात अशा बारवांना "जलमांडवी" म्हटलं आहे. अन्य बारवेच्या बांधकामापेक्षा हे जास्त खर्चिक असतं. बारव निर्मितीची या स्थापत्याची उपयुक्तताच यातून स्पष्ट होते. त्यातील प्रकार खालीलप्रमाणे,
1) एकमंडपयुक्त बारव :-
ह्यात एक मंडप असतो. लोणी भापकर येथे अशी बारव असून त्यात एक मंडप 28 देवकोष्ठ आहेत. मंडपाच्या स्तंभावरील अलंकरण लक्षणीय आहेत. तसेच ब्राम्हणी (अहमदनगर) येथे सुद्धा आहे.
2) दोन मंडपयुक्त बारव:-
उत्तर-दक्षिण भागात दोन मंडप असतात. तीन टप्पे असून. दोन बाजूस स्वतंत्र मंडप बांधलेले असलेला मंडप खालील मुख्य कुंडापर्यंत पुढे आलेले असतात. लोणार (जिल्हा बुलढाणा) या ठिकाणी लिंबी बारव एक महत्त्वपूर्ण बारव असून गावात अन्य कुंडही आहेत. केंद्रिय पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली ही वास्तू 26 चौ. मी. आकाराची असून एकूण पाच टप्प्यात पूर्ण करण्यात आली आहे. बारवेत सर्वात शेवटी असलेल्या कुंडानंतर पाच पायऱ्या ठेऊन त्यावर एक सोपान ठेवला आहे. हा 25 सें. मी. रुंदीचा आहे. टप्प्यावरील पायऱ्यांना कोठेही पुढे आलेला दट्टा अथवा तोंडशिळा दिसत नाही. यावरील दुसरा सोपान पाच पायऱ्यानंतर असून तो 70 सें. मी. रुंदीचा आहे. त्यानंतरचा सोपान 73 सें. रुंदीचा आहे. यावरील सोपान सर्वात रुंद असून तो 2.10 मी. आहे. या सोपानावर सर्व बाजूंनी मंडप बांधलेला होता. मुळात असलेला हा मंडप आज अस्तित्वात नसून केंद्रिय पुरातत्व जतनविषयक कामानंतरसुध्दा येथे दिसणाऱ्या अवशेषावरून या मंडपाची कल्पना स्पष्ट होते. मंडपातून बाहेर पडणारे प्रवेश मार्ग उत्तर-दक्षिण पश्चिम बाजूस आहेत.
3) तीन प्रवेशयुक्त बारव :-
वस्तुतः बारव या स्थापत्य प्रकारामध्ये चार प्रवेश हा सर्वसामान्य प्रकार आढळतो. पण काही वेळा उपलब्ध क्षेत्र व स्थानिक काही कारणांमुळे तसेच पाण्याच्या कमीअधिक उंचीवरील उपलब्धतेमुळे मूळ आराखड्यात काही बदल केल्याचे दिसतात व यातूनच तीन प्रवेशयुक्त बारवांची निर्मिती झाली असावी.
4) चार प्रवेशयुक्त बारव :-
बारव स्थापत्यात सर्वत्र रूढ असलेला हा प्रकार असून मधोमध असलेले कुंड व त्यावर विकसित होत जाणारे टप्पे, मुख्य सोपानानंतर असलेली संरक्षक भिंत व चारही बाजूंनी असलेला प्रवेश अशी याची रचना आहे. संरक्षक भिंत उभारताना एक सलग गजथर उभारून त्यावर विविध दवदेवतांसाठी स्वतंत्र अशी 24 देवकोष्ठ निर्माण केली आहेत. याशिवाय विविध देवता, देवांगना, देवानुचर, देवता परिवार व असूर यांचे शिल्पांकन येथे आहे. विविध प्रकारची भौमितीक नक्षी, अश्वारूढ योध्दे, त्यांच्या कवायती. याशिवाय हंसथर व नृत्यांगना पहावयास मिळतात. देवकोष्ठ उभारताना विकसित मंदिराची लहान प्रतिकृतीच साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.
"बृहत्कल्पसूत्रभाष्य" या जैन ग्रंथा मध्ये सुद्धा बारव बद्दल माहिती आहे. ह्यातील श्लोक खालील प्रमाणे :-
1) नन्दा नन्दवती पुनर्नन्दोत्तरा नन्दिषेणा अरजा विरजा गतशोका वीतशोका विजय वैजयन्ती जयन्ती च।। ९६९।।
अवरा। अपराजिता च रम्या रमणीया सुप्रभा च चरमा पुनः सर्वतोभद्राः। एताः सर्वा रत्नतट्यो लक्षयोजनप्रमिताः पूर्वदिग्भागादितो ज्ञातव्याः।। ९७०।।
अर्थ:- नन्दीश्वर द्वीप च्या पुर्व दिशेला नन्दा, नन्दवती, नन्दोत्तरा आणि नन्दिषेणा ह्या चार वापिका आहेत दक्षिण दिशा मध्ये अरजा, विरजा, गतशोका आणि वीतशोका; पश्चिम दिशा मध्ये विजया, वैजयन्ती, जयन्ती आणि अपराजिता. उत्तर दिशा मध्ये रम्या, रमणीया, सुप्रभा और सर्वतोभद्रा ह्या चार वापिका आहेत हैं. ह्या सर्व वापीकांचे तट अलंकारीत आहेत. ह्या १००००० योजन प्रमाण च्या आहेत.
2) अनन्तरं तासां वापीनां स्वरूपमाह—सव्वे समचउरस्सा टंकुक्किण्णा सहस्समोगाढ़ा। वेदियचउवण्णजुदा जलयरउम्मुकजलपुण्णा।I९७१।।
सर्वाः समचतुरस्राः टज्रेत्कीर्णाः सहस्रमवगाधाः। वेदिकाचतुर्वर्णयुता जलचरोन्मुक्तजलपूर्णाः।। ९७१।।
सव्वे ताः सर्वाः समचतुरस्राष्टज्रेत्कीर्णाः सहस्रयोजनावगाधाः l
वेदिकाभिश्चतुर्वनैश्च युक्ताः जलचरोन्मुक्तजलपूर्णाः स्युः।। ९७१।।
अर्थ:- ह्या सर्व वापिका एक लाख योजन लांब आणि एक लाख योजन रुंद अर्थात् समचतुरस्र आकार च्या आहेत. टज्रेत्कीर्ण अर्थात् वरून खाल पर्यंत समान आहेत. खोली १००० योजन प्रमाण आहे. ह्या वापी एक ते चार जंगल च्या जवळ आहेत.
मोठ्या प्रमाणात या वास्तूंची निर्मिती अकराव्या ते तेराव्या शतकात झाली. अभिलेखीय नोंद उपलब्ध असलेल्या बहुतांश बारवा या बाराव्या शतकातील आहेत. उदा. गणेशवाडी येथील विक्रमादित्य सहावा याच्या काळातील लेख, होट्टल येथील चालुक्यकालीन शिलालेख, लातूर येथील भूतनाथ मंदिरातील लेख किंवा धर्मापुरी येथील शिलालेख आज अस्तित्वात असलेल्या वारवांचा विचार करता त्या तंत्रदृष्ट्या उत्कृष्ट होत्या असे म्हणता येईल. त्यामुळे आजही अशा वास्तू कमी-अधिक प्रमाणात उपयोगात आणल्या जातात. जेथे बारव, जलमांडवी, पोखरणी आहेत त्याठिकाणी उपलब्ध शिलालेखांचा अभ्यास करताना हे स्पष्ट होते की, अशा वास्तूची निर्मिती होत असताना केवळ कुठल्या एका विशिष्ट राजवंशाची सत्ता नव्हती; किंबहुना राष्ट्रकूट, कल्याणचे चालुक्य, शिलाहार, कलचुरी यादव या राजवंशांची सत्ता असताना त्या त्या स्थानावरील महत्वाकांक्षी सनानी सामंत, श्रेष्ठी व क्वचित जागी सामान्य गणिकांनीही स्वतंत्रपणं याची निर्मिती केली आहे. स्वाभाविकपण रूढ आराखड्यांना स्वीकारून ही निर्मिती झाली असली तरी काही स्थानिक वैशिष्ट्यंही त्यातून व्यक्त झाली आहेत. उत्तर काळात साधारणतः चौदाव्या शतकानंतर मंदिराची निर्मिती कमी झाली, तसंच अशा प्रकारच्या बारवांची निर्मितीही थांबली. यानंतर विहिरीत चौरस व वर्तुळाकार आणि एका बाजूने प्रवेश असलेल्या विहिरी निर्माण झाल्या. प्रामुख्याने ज्या राजवटीत प्रार्थना मंदिरांवर गोलघुमट बांधण्यात आले त्या काळात कटोरा बावडी हा प्रकार लोकप्रिय झाला. मोठ्या आकाराचे अनेक मजले व दालने असलेल्या विहिरींचीही निर्मिती झाली. यांना कुपागार म्हणणे योग्य ठरते. उत्तर काळातसुध्दा शाश्वतमुल्य असलेल्या बारवांची जपणूक झाली.
संकलन- गोरक्ष मोहिते पाटील
Reference:-
1) अपराजितपृच्छा
2) बृहत्कल्पसूत्रभाष्य
3) Maharashtra gazatter
4) G.B.Degulkar
5) A.V. Naik
0 Comments