Ticker

6/recent/ticker-posts

अर्जुन वृक्ष मराठी

#बोधिवृक्ष:- अर्जुन 
२८+१ बुद्धांपैकी अनोमदर्शी/अनोमदस्सी बुद्धांना अर्जुन वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यामुळे अर्जुन वृक्षाला बोधिवृक्षाचा दर्जा प्राप्त आहे. 
आर्य (आचार्य) नागार्जुन बोधिसत्व हे भारतीय तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्रज्ञ, खनिजशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, वैद्य, शून्यवादाचे उद्गाते व विद्वान बौद्ध भिक्खू होते. ते महायान बौद्ध पंथाचे एक संघटक होते. नागार्जुन यांचे चरित्रकार 'कुमारजीव' यांच्या मतानुसार नागार्जुन यांचा जन्म विदर्भातील असून त्यांचा जन्म अर्जुन वृक्षाच्या मुळांजवळ झाला होता. तसेच नागार्जुन यांना नाग राजांचे सरंक्षण प्राप्त असल्यामुळे त्यांना नाग+अर्जुन हे नाव मिळाले. 
रामटेकजवळील मनसर टेकडीवर झालेल्या उत्खननात मोठ्या प्रमाणात बौध्दकालीन अवशेष आढळले असून त्यात नागार्जुनाच्या अस्थीही सापडल्याचा दावा केला जातो. याच भागात पूर्वी अनेक अर्जुन वृक्ष होती. ज्याची खोडे व उंची भारतात कुठेही आढळणार नाहीत अशी प्रचंड होती. बौद्ध धर्मगुरु भंदत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी मा. नितीन गडकरी यांना निवेदन देऊन या भागातील वृक्ष वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भागात जवळपास ७०० अर्जुन वृक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 

अर्जुन हा स्वाती नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. मूळ अर्जुन या संस्कृत शब्दाचा अर्थ “पांढरा स्वछ”, “दिवसाच्या प्रकाशासारखा” असा आहे. अर्जुन वृक्षाला त्याच्या पांढऱ्या खोडामुळे हे नाव मिळाले आहे. पांढऱ्या किंचित हिरवट-राखाडी झाक असलेल्या गुळगुळीत खोडाचा हा वृक्ष अस्सल भारतीय वंशाचा आहे. ऐन (आईन) आणि अर्जुन एकाचवेळी पावसाळ्यात फुलणारे व ताक घुसळण्याच्या रवीच्या बोंडाप्रमाणे पाच पंख असलेली फळे धारण करणारे असतात. फरक केवळ खोडात दिसतो. ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले व तपकिरी रंगाचे तर अर्जुनाचे गुळगुळीत व पांढरे असते. त्यामुळेच कोकणात हा पांढरा ऐन म्हणून ओळखला जातो. Star Fruit किंवा करमळ याचे फळही अर्जुन वृक्षाच्या फळाप्रमाणेच दिसत असल्यामुळे मोठा गोंधळ होतो. 

अर्जुनाचे झाड वयात आले की एखाद्या दधीची ऋषींसारखी, त्याची साल आपोआप गळून पडते. मानवाच्या आरोग्यासाठी ती देवासारखी उपयोगी पडते म्हणून त्या झाडाला देवसाल, शक्रतरू, इन्द्रू अशी इंद्राची नावे आहेत.नदीकाठी अर्जुनाची चांगली वाढ होते म्हणून याला नदीसर्ज असे नाव आहे. अनेक वृक्षांपासून चीक मिळतो. पण अर्जुनवृक्षाचा गोंद (चीक) हा सुंदर, पारदर्शक, स्वच्छ, बल्य व पौष्टिक आहे. त्यामुळे अर्जुनवृक्षाला क्षीरस्वामी असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. 

ऐन आणि अर्जुन एकाचवेळी पावसाळ्यात फुलणारे व ताक घुसळण्याच्या रवीच्या बोंडाप्रमाणे पाच पंख असलेली फळे धारण करणारे असतात. फरक केवळ खोडात दिसतो. ऐनाचे खोड खरखरीत भेगा पडलेले व तपकिरी रंगाचे तर अर्जुनाचे गुळगुळीत व पांढरे असते. त्यामुळेच कोकणात हा पांढरा ऐन म्हणून ओळखला जातो. सालीतील कॅल्शियम मॅग्नेशियम व इतर उपयुक्त घटकांच्या संपन्नतेमुळे हा बलकारक आहे. म्हणून याला धन्वंतरी हे नाव मिळाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग नागार्जुन प्रचंड मोठया अर्जुन वृक्षाखाली आहे. ज्याचे बुद्धिपुरस्सर सेवन केले जाते, अशा त्याला सेव्य असे नाव मिळाले. 

अर्जुन (टर्मिनलिया अर्जुन)च्या जगभरात २०० प्रजाती आहेत. भारतात अर्जुनच्या झाडाच्या सुमारे २४ प्रजाती प्रामुख्याने उत्तर प्रदेश, दक्षिण बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बंगालच्या उप-इंडो-हिमालय पर्वतात आढळतात. 

ककुभ म्हणजे दिशा. ज्याचा पसारा सर्व दिशांना पसरलेला आहे, म्हणून अर्जुनला 'ककुभ' म्हणतात. याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात अरण्यकांडात येतो,

ककुभः ककुभोरुं तां व्यक्तं जानाति मैथिलीम्।
लतापल्लवपुष्पाढ्यो भाति ह्येष वनस्पतिः॥
भ्रमरैरुपगीतश्च यथा द्रुमवरो ह्यसि।
एष व्यक्तं विजानाति तिलकस्तिलकप्रियाम्॥

महाभारतात अर्जुनाने पाशुपतास्त्र शिवशंकरांकडून प्राप्त करण्यासाठी अर्जुनवृक्षाखालीच तपश्चर्या केली होती. असा उल्लेख आढळतो. बालकृष्ण लिलेतील यमलार्जुन कथेतही अर्जुन वृक्षाचा उल्लेख येतो. 

संपूर्ण अर्जुन वृक्ष औषधी गुणांनी समृद्ध आहे. अर्जुन वृक्षाची साल अनेक आजार दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. मात्र हृदयासंबंधित समस्या दूर करण्यासाठी अर्जुन साल खूपच फायदेशीर आहे. अर्जुन वृक्षाची साल हृदयासाठी उपयुक्त असल्याचे सर्वप्रथम बोधिसत्व अवलोकितेश्वर यांचे शिष्य महर्षी वाग्भट यांनी शोधून काढले. आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आपले हृदय म्हणजेच आपले हार्ट असते. हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यावर अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग आणि त्याचे फायदे याबद्दल आतापर्यंत अनेक स्टडीज केल्या गेल्या आहेत.अर्जुन साल हृदयाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे. हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर अर्जुन सालचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. तसेच हृदयातील जळजळ दूर करण्यात मदत होते. हृदयाला बळ देण्यासाठी अर्जुन साल उपयुक्त ठरते.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अर्जुनची साल इतर औषधी वनस्पतींसोबत वापरली जाते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये डिस्पनिया आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर सुधारत असल्याचे दिसून आले आहे. अर्जुन साल आयुर्वेदानुसार खोकला, दमा आणि काही संक्रमणांसह फुफ्फुसाच्या विकारांवरदेखील मदत करू शकते.

आयुर्वेदानुसार अर्जुनाची साल हृदयरोगावर गुणकारी आहे. तसेच त्याच्या फुलांपासून उत्तम नेत्रांजन बनते. अर्जुनासव व अर्जुनारिष्ठ औषधे सालीपासुन बनवतात. अर्जुनची साल दुधासोबत ही खूप गुणकारी आहे पण ती वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी. मुकामार, हाड तुटणे यासाठी सालीचा वापर होतो. कमी झालेला रक्तदाब वाढण्यासाठी व हृदयाचे आकारमान वाढले असल्यास अंर्तसालीचा वापर करावा. 

अर्जुन वृक्षाची साल हृदय रोग, क्षय, पित्त, कफ, सर्दी, खोकला, अत्याधिक कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणासारखे आजार दूर करण्यास मदत करते. त्यात बीटा-साइटोस्टेरॉल, एलाजिक ॲ‍सिड, ट्रायहायड्रॉक्सी ट्राईटरपीन, मोनो कार्बोक्झिलिक ॲ‍सिड, अर्जुनिक ॲ‍सिड आढळतात. या प्रकरणी केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (सीआयएमएपी), लखनऊ येथे झालेल्या एका संशोधनात असे समोर आले की, अर्जुन वृक्षाच्या सालीमध्ये एक असे संयुग आढळते ज्यात कॅन्सरच्या पेशींना नष्ट करण्याची क्षमता आहे. त्याचे नाव अर्जुनिक ॲ‍सिड असे ठेवण्यात आले आहे. ते ओरल आणि ओवरीच्या कॅन्सरवर फायदेशीर आहे. तसेच, या संदर्भात झालेल्या इतर काही संशोधनाच्या निकालांनुसार, अर्जुनाच्या झाडात कॅसुआरीनिन नावचे रासायनिक घटक देखील आढळते. या घटकामुळे कॅन्सरच्या पेशींना शरीरात पसरता येत नाही.

अर्जुन वृक्षाचे लाकूड हे रंगाने लाल, कठीण व टिकाऊ असते. इमारत बांधकामासाठी मुख्यत्वेकरून उपयोग केला जातो. मंदिर बांधकामासाठी याचे लाकूड उत्तम मानले जाते. गाभ्याचे लाकूड तपकिरी व खूप कठीण असते. बाह्य लाकूड पांढरट-लालसर असते. लाकडामध्ये वर्षायु वलये नीट दिसत नाहीत.कृषि अवजारे, बोटबांधणी, गाड्यांची चाके, प्लायवूड इत्यादीसाठी वापर केला जातो. कोळसा निर्मितीसाठी ही प्रजाती चांगली मानली जाते. जळाऊ इंधन, चारा इ. साठीही वापर करतात.लाकूड पाणथळ जागेतील कामासाठी उत्तम. जुन्याकाळी विहिरी बांधताना उपयोग केला जात असे. 
अर्जुनसालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी आणि रंगविण्यासाठीही करतात. अर्जुनाची पाने रेशीम किडयांच्या पोषणासाठी वापरली जातात. 

अर्जुन फळाच्या सेवनाने तोंडाची दुर्गंधी दूर करता येते. तसेच ज्यांना दातातील पोकळीची समस्या आहे किंवा हिरड्यांची समस्या, दातदुखीची समस्या, दातांमध्ये रक्तस्त्राव किंवा तोंड खराब होण्याची समस्या आहे ते अर्जुनाच्या फळाचा वापर करून या समस्येवर मात करू शकतात. याशिवाय दातांची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी अर्जुनाची सालही उपयुक्त आहे. अनेकदा काही लोकांना लघवीमध्ये अडथळे येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा स्थितीत अर्जुनाच्या फळाचे सेवन केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. परंतु जर तुम्हाला लघवीशी संबंधित इतर समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अर्जुन फळाच्या सेवनाने मूत्रमार्गाच्या समस्यांवरही मात करता येते. 

नदी-ओढ्याच्या काठची धूप थांबवण्यासाठी, पाण्यातील क्षारता कमी करण्यासाठी आणि पक्षांना आसरे निर्माण करण्यासाठी अर्जुन वृक्षाची बरोबरी करणारा बहुगुणी कल्पवृक्ष शोधूनही सापडणे कठीण आहे. रस्त्याच्या कडेने लावण्यासाठी तसेच उद्यान वृक्ष म्हणूनही अर्जुन वृक्ष प्रसिद्ध आहे.

वाल्मिकी रामायणामध्ये वनवासात सितेच्या विरहाने व्याकूळ झालेल्या प्रभू रामचंद्रांना अर्जुन वृक्ष पाहिल्यावर अधिकच तिव्रतेने मैथिलीची आठवण होते असे हृद्य वर्ण केले गेले आहे; कारण अर्जुन वृक्षाचा गौरवर्ण आणि नितळ कांती! उंचच उंच वाढलेले भरदार आणि डौलदार अर्जुन वृक्षराज पाहिल्यावर महाभारतातील कुंतीने आपल्या पुत्रोत्तमाचे नाव त्याच्यावरुनच अर्जुन ठेवले असल्याची खात्रीच पटते. नंतर त्या दोघांमधील एकरुपता एवढी वाढत गेली की अर्जुन वृक्षाला पार्थ आणि धनंजय अशा टोपणनावांनीही ओळखले जाऊ लागले.

सूचना:- वरील सर्व माहिती विविध संदर्भातून संकलित करण्यात आलेली आहे. अनावधाने यात काही चूकही घडू शकते. आपणांस तसे आढळल्यास त्वरित कळवावे. या लेखातील सर्व वैद्यकीय उपाय आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वत: करु नयेत. 

अशा या पवित्र बोधिवृक्ष अर्जुन वृक्षाला माझे त्रिवार वंदन!

Post a Comment

0 Comments