Ticker

6/recent/ticker-posts

मंदिरे आणि संस्कृती

मंदिरे आणि संस्कृती 



मंदिरे ही भारतीय संस्कृतीची व्यवच्छेदक लक्षणे आहेत. मंदिरांशिवाय भारतीय संस्कृतीचा विचार करा,हिंदू धर्म मंदिरे वगळून विचार करा. त्यानंतर हिंदू संस्कृतीची ओळख म्हणून काही राहणार नाही. मंदिरे ही प्रत्येक कालखंडात त्या त्या राजवटींची सांस्कृतिक आणि सामाजिक आरसा ठरली. समाजातील प्रत्येक अंगाचे चित्र मंदिर स्थापत्यावर दिसून येऊ लागले. वस्त्राभूषणे, नित्य दैनंदिन कामे, प्रांतीय संस्कृती, त्यांच्या रुढी परंपरा या मंदिरांवर सूक्ष्म निरीक्षणाद्वारे दिसून येतात.  
       मराठा कालखंडात नागपूरकर भोसल्यांनी बंगालवर आक्रमण केले आणि बंगालच्या संस्कृतीची छाप नागपूरवर पडली. भोसल्यांच्या मंदिरावर असलेले शिल्प बंगाली कपडे, आभूषणे, अलंकार घातलेले दिसतात. मंदिरांची शिखरे भूमीज पध्दतीने व पूर्व भारतीय रीतीने घडवलेली दिसतात. एका राजाने दुसर्या राज्यावर अथवा दुसर्या भूप्रदेशावर आक्रमण करून जरी राजकीय विजय मिळवला असला तरी स्थानिक संस्कृतीवर पूर्णवर्चस्व कुणीही मिळू शकत नसे. एकाच कालखंडात उदयाला व लयाला गेलेल्या गुप्त वाकाटक राजवटीने स्वत:ची मूर्ती व स्वत:शी स्थापत्यशैली बनवली. स्वत:ची स्वतंत्र ओळख सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण केली. मध्ययुगीन कालखंडा पर्यंत वास्तु निर्मितीमागे धर्म हा प्रधान असे. समाजात धर्माचे प्राबल्य अतोनात होते.शहराची निर्मिती, गावगाडा, राजांची ईश्वरभक्ती व सामान्य लोकांचा मंदिर निर्मितीमागील सहभाग हा या लिखाणा मागे  प्राथमिक हेतू आहे. मंदिरही प्रत्येक कालखंडात सामाजिक संस्था ठरली. समाजातील प्रत्येक घटक मंदिराशी कशाप्रकारे एकरुप होत गेला हे काही ऐतिहासिक उदाहरणांद्वारे पाहू ...
वैदिक धर्मात प्रामुख्याने यज्ञ संस्कृती होती. यज्ञाद्वारे देवतेला प्रसन्न करावे ही साधारण समजूत होती. पुढे ग्रीकांच्या प्रभावाने म्हणा अथवा बुद्ध धर्माच्या प्रभावाने म्हणा मंदिरे वास्तुरूपात येऊ लागली. मंदिरांच्या काही कल्पना जगभरात समसमान पध्दतीने आलेल्या होत्या. डोंगरात मंदिर कोरण्याची कल्पना जावा, बाबीलोनचे झिगुरात पॅसिफिक महासागरा पलीकडील अमेरिकेच्या मध्य व दक्षिण भागात इंका व माया यांनी प्रत्यक्षात उतरवली. मंदिरांमुळे नित्यनियमाने एकत्रित येण्याची व सामूहिक रित्या कर्मकांड करण्याची जागा उपलब्ध होऊ लागली. 
  पहिला प्रश्न जो पडतो तो म्हणजे देवळात जायचे कशाला ? त्याच सरळ उत्तर म्हणजे केवळ चक्षुणे  देवतेला पाहण्यासाठी नव्हे, तर गाभाऱ्यात मूर्ती रूपाने प्रतिष्ठापित असलेल्या तत्त्वाचा साक्षात्कार व्हावा म्हणून. मंदिर निर्मितीमागे मुख्य हेतू म्हणजे भक्ताने आध्यात्मिक उन्नती साधणे आणि पापमुक्ती करून मोक्ष साधने.पौराणिक संकल्पनेनुसार मंदिर म्हणजे अदृश्य देवतेच्या दृश्य रुपातील मूर्ती ज्याच्यात प्रतिष्ठित असते ते बाह्यावरण.मानवी देहा प्रमाणे ते निराकाराचे दृश्य बाह्यांग होय असेच समजायला हवे.   मंदिरात जाऊन सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती साधायच्या असतात. मंदिराच्या बाहेर संसार सोडून अधिष्ठान चढून त्या परमेश्वरा जवळ पोहोचायचे असते.  त्या परमतत्त्वाचे मूर्ती रूपाने दर्शन झाल्यावर भक्त कृतकृत्य होतो. 
      'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।'
    हे संतांचे शब्द या बाबतीत अगदी बोलके ठरतात.
    मंदिराची वास्तू कशी असावी ? त्या वास्तूतून कोणता संदेश लोकांपर्यंत पोहचावा ? याचं उत्तर वराहमिहिर याच्या बृहत्कथा या ग्रंथामध्ये आहे. स्थापत्यशास्त्रावर एक स्वतंत्र अध्यायच त्यात आहे. त्यात त्याने ब्रह्मांडाची प्रतिकृती ज्यात दिसेल अशी वास्तू साकारण्याचे आव्हान केले आहे. दिव्य पुरुषोत्तमाच्या रूपात देवतेला पाहता येईल अशी अनुकूल वास्तू म्हणजेच मंदिर असे मयमतात म्हटले आहे. कलश म्हणजे केस, आम्लक म्हणजे मस्तक, कंठ म्हणजे गळा,शूकनास म्हणजे नासिका, वेदी म्हणजे स्कंद(खांदा),प्रवेशद्वार म्हणजे मूख, कवाड म्हणजे ओष्ठद्वयन,जंघा म्हणजे मांड्या आणि मूर्ती म्हणजे साक्षात प्राणच(जीव) या सर्व घटकांनी मिळून जे मंदिर बनते त्याल 'समरांगणसूत्रधार' नुसार प्रसाद म्हणतात (नागरशैली)आणि 'ईशानशिवगुरुदेवपद्धती' नुसार त्याला विमान म्हणतात(द्राविड शैली).
     मंदिर निर्मिती ही पूर्णपणे राजाच्या साहाय्याव अवलंबून असे. त्यामुळे समजूत अशी होती की राजा हा विश्वातील महत्त्वाचे कार्ये करणार्या आठ देवांचा (लोकपालांचा) पृथ्वीवरील प्रतिनिधी आहे. त्यामुळे जर राजा हा देवाचा प्रतिनिधी असून प्रासादात राहतो तर देवाच्या निवासवास्तूचे स्वरूप अनेक मजली प्रासाद असावे हे ओघानेच आले. देवाची दिनचर्याही राजाशी मिळतीजुळती ठेवण्यात आली. उदा. दर चार घटिका नंतर देवळात नगारा वाजवण्यात येऊ लागला. यालाच चौघडा म्हणतात. भूपाळ्या म्हणून त्याला उठवणे, रात्री झोपवणे, नैवेद्य दाखविणे, त्याची संगीताने नृत्याद्वारे करमणूक करणे हेही दिनचर्येचे भाग होते. या सर्व उपचाराचा अंगभोग आणि रंगभोग अशी नामाभिधाने आहे. देवाला हे असे राजासारखे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे पूजाविधीत अनेक राजोपचारांचा समावेश झाला. हे सर्व राजोपचार यथासांग पार पडावेत यासाठी मंदिराच्या तलविन्यासातही काही बदल घडून आले. मंडप आणि गर्भगृह यांच्यामध्ये अंतराळाची योजना करण्यात आली. आणि मंडपामध्ये नृत्याकरिता एका चौकाची (रंगमंडपाची) भर पडली. गर्भगृहावरील अनेक मजले अभिव्यक्त करणारे शिखर आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आणि प्रतिहार आले...


#temple #ancientindia

Post a Comment

0 Comments