पेशवेकालीन खेडेगावातील पाटलांचे अधिकार व हक्क तसेच खेडेगावातील व्यवस्था. भाग १
शिवकालीन वा पेशवेकालीन खंडेगावचे पाटिल यांचे विषेश अधिकार व मानपान हा विषय नेहमीच अभ्यासाचा असतो. पाटलांचे अधिकार त्यांचे मानपान, हक्क, गावातून पाटलास कोणते व कसे कर मिळत यावर प्रकाश हा पेशवेकालीन खेडेगावातील व्यवस्थेवरुन अधिक टाकता येईल. पेशव्यांच्या प्रशासनामध्ये गावचा पाटील हा न्यायाधीश होता. गावातील न्याय निवाडे गोतसभेत तो करत असे. जरी पाटिल अतिशय उपयुक्त असला तरी त्याला सरकार कडून पगार दिला जात नसे. गावातल्या लोकांकडून त्यांना तो मिळे. "शके १६५३ मध्ये खुजेस्ले बुनियाद सुभ्यातील जुन्नर सरकारा खालील परगणे करडे मधील भाण गावचे पाटीलकीचे अर्धे वतन रु. ७७५१/- ( सात हजार सातशे एकावन्न रुपयास) बांगोजी कुदंदा याने गोरखोजी भापकर यास विकले. त्या खरेदीखतात सर्व अधिकार आणि पाटीलकीचे इतर हक यासंबंधीचे सविस्तर वर्णन मिळते. त्याचे मानपान आणि हक्क खालीलप्रमाणे सविस्तर दिले आहेत. " या वरुन पाटलांच्या गावातील मानपान, मिळकत, हक्क, या सर्व बाबींचा आदमास लागतो.
शके १६५३ मधील खरेदी खतातील गोरखोजी पाटील व बंगोजी पाटील यांचे गावातील मानपान खालील प्रमाणे-
मोकादमीचे गाव आधी गोरखोजी पाटील म्हणून बंगोजी पाटील, त्याप्रमाणे लिहावे. दिवाणात भेट गोरखोजीनी करावी. बंगोजीनी करू नये. दिवाणातून शिरपाव व पाने आधी गोरखोजी पाटील यांनी घ्यावी. मागून बंगोजी पाटील यांनी घ्यावी... पोळ्याचा बैल आधी गोरखोजी पाटील याच्या वेशीतून यावा, मागून बंगोजी पाटील यांचा यावा. तोरण मांगाने व गेरू महाराने आधी गोरखोजी पाटील याचे घरी द्यावी, मागून बंगोजी पाटील यांचे घरी द्यावी. दीपावळीचे वाजंत्रीआधी गोरखोजी पाटील यांचे घरी वाजवावे, मागून बंगोजी पाटील यांचे घरी वाजवावे. कोळ्याने पाणी आधी गोरखोजी पाटील यांचे घरी घालावे. मागून बंगोजी पाटील यांचे घरी घालावे. 'गणेश गवर' आधी गोरखीजी पाटील याची वाजवीत आणावी आणि दुर्गामातेपाशी ठेवावी. मागून बंगोजी पाटील यांची न्यावी. होळीची पोळी बंगोजी पाटील यांची वाजवीत आणावी आणि त्यांचीच लावून मागाहून गोरखोजी यांची आणून लावावी. दसरियासी वाजंत्री आधी बंगोजी पाटील यांचे घरी मागून गोरखोजी यांचे घरी. गावच्या माळ्याने फुले व गुरवाने बावरी आधी बंगोजी पाटील यांचे घरी मागून गोरखोजी पाटील यांचे घरी. दसरियाची आपटियांची पूजा आधी बंगोजी पाटील यांनी करावी, मागून गोरखोजी पाटील यांचा आणून दोन्ही एका जागा करून पुढे बंगोजी पाटलाचा, मागून गोरखोजी पाटलाचा आणावा. टिळा विडा आधी गावातील बंगोजी पाटील यांनी करावी, मागून गोरखोजी पाटील यांचे घरी द्यावा. हरिजागर कार्तिक वद्यप्रतिपदेस आधी बंगोजी पाटील यांनी करावा, मागून गोरखोजी पाटील यांनी दुसरे दिवशी करावा. तुळशीची पूजा कार्तिक द्वादशीची आधी बंगोजी पाटील यांचे घरी ब्राह्मणाने सांगावी, मागून गोरखोजी पाटील यांचे घरी सांगावी. मागून गोरखोजी पाटील यांचे घरी द्यावी.
वरील मजकुरात गावच्या पाटलांना गावातील प्रत्येक सन असो उत्सव असो समाजात असो यात प्रथम मान हा पाटलाचा होता. त्या नंतर कुलकर्णी याचा मान त्या नंतर त्यानंतर चौगुला याचा मान असे. तर या मानपानात एक मुद्दा लक्ष देण्या सारखा आहे तो म्हणजे गौरी गणपती चा वाजवत आणण्याचा पहिला माण हा गोरखोजी पाटील याचा होता. यावरूनच असा स्पष्ट तर्क निघतो कि गणेश गवर हा सन खुप जुना आहे. तो शके १६५३ च्या हि दशको वर्ष आधीपासून चालत आला असावा म्हणूनच त्याच्या मानपानाचे एवढे महत्व होते. यावरुन अजून एक गोष्ट लक्षात येते कि गणेश गवर हा उत्सव पुर्वी घरोघरी साजरा केला जात होता. पुढिल भागात याच खरेदीखतातील गोरखोजी पाटील व बंगोजी पाटील यांचे गावातील हक्क व मिळकत याची केलेली वाटणी पाहणार आहोत व त्यावरुन पाटील गावावर कर कसा व कोणत्या स्वरूपात लावत याचा तपशील पाहणार आहोत. (क्रमशः)
पेशवेकालीन खेडेगावातील पाटलांचे अधिकार व हक्क तसेच खेडेगावातील व्यवस्था. भाग २.
भाग १ वरुन पुढे. तर भाग एक मध्ये पाहिल पेशवेकालीन शके १६५३ च्या पाटिलकीच्या खरेदीखतातील बांगाजी कुंददा व गोरखोजी पाटील या दोन्ही पाटलांच्या गावातील मानपान व अधिकार. या भागात पाहुयात याच दोन्ही पाटलांची 'भान' गावच्या पाटिलकीतुन मिळणारे हक्क, मिळकत वा उत्पन्न मग ते वस्तु स्वरुपात व काहि रोख रक्कमे स्वरुपात आहे. या खरेदीखतावरुन शिवपुर्व काळात शिव उत्तर काळात वा पेशवे काळात काय मानपान होते, हक्क, मिळकत, वसुल, अधिकार यांवर बराच प्रकाश टाकतात येईल.
गावातून मिळणारे हक्क, मिळकत तथा उत्पन्न.-
शेलपाटी दर बुडास मोकार १ ½ मण, एकपाल भारा दर असामीस कडबा. हुरडा दर असामीस भारा एक (२५ कणसे ज्यारी). कापूस दर टिकियास वजन ५ शेर (प्रत्येक शेतातून). ज्वारीचा भारा दर आसामी एक. चांभाराचे जोडे दरसाल दोन द्यावे. पालभारा दर असामीस कडबा. तेलियाच्या दर घाणियास तेलाच्या 'नवटक'. तांबोळियाच्या दर दुकानास दररोज पाने सुमारे १३. गुन्हाळास दरशेती हक्क, एक गुळाची ढेप, एकाची मोळी, एक रसाची माण (एकूण ३) सदरहू जोशी याचे मळ्यात न घ्यावे. एक बकरे दसरियाचे कळपास एक घ्यावे. एक साळी, एक कोष्टी, एक मोमीन याच्या दर मागास दरसाली अटफळे एक घ्यावे. एक धनगरियाच्या मागास दरसाल अटफळे एक घ्यावे. खोबरियाच्या वाट्या (१ मागणीस, १ फुल लग्राची, १ पाटीची अश्या एकूण ३) माळव्याची शेव माळव्यानी द्यावी. ( म्हणजे- माळ्याकडून भाजी घ्यावी.), माळ्याच्या मळ्यामध्ये धान्य पेऱ्याखेरीज जिन्नस होईल त्यास एक वाफा द्यावा. वाणियाच्या दर दुकानास दररोज एक सुपारी द्यावी. वाणियाच्या किराणियाचे गोणीस मोकादमास हक वजन पावशेर. वाणीयाचे बिऱ्हाडी राहतील त्याकडे वोटला घाटा शिरस्तेप्रमारे घ्यावा. मीठ व भुसाचे गोणीस शिरस्त्याप्रमाणे मोकदामाचा हक्क. बाहेजमा दरसाल रुपये २५, (नव्याने गावात येणाऱ्यावरील कर.). जे उत्पन्न होईल ते बंगोजी पाटील व गोरखोजी पाटील यांनी निम्मे निम्मे घ्यावे. मुंढी वसात व शिकार उभयतांनी वाटून घ्यावी, मागून बंगोजी पाटील यांनी घ्यावी (कोणत्याही वसाहतीचे दोघांनी निम्मे निम्मे घ्यावे.) गावापाशी नवीन पेठ वसविता ज्याच्या थळात वस्ती होईल त्याने कटकट करायचा संबध नाही. येथिल लाजिमा, हक, मानपान होईल ते दोघांनी निम्मे निम्मे घ्यावे.
पाटलांना सरकारकडून वेतन मिळत नसे तर ते गावातून वस्तु स्वरुपात मिळत असे. वरील दोन्ही भागावरून पाटलांचे मानपान, हक्क, अधिकार, उत्पन्न हे बऱ्याच अंशी समजेल. गावगाड्यातील या पद्धती शिवपुर्व काळात हि तश्याच होत्या व शिवकाळात व उत्तर काळात तसेच पेशवे काळात हि तश्याच होत्या. त्या बदल केला नाही वा झाला नाही. गावातील सत्ता हि स्वातंत्र्य स्वरुपात असे. राजा सुद्धा गावातील नियम कायदे यांच्यात जास्त दखल देत नसे. स्वायत्त सत्ता म्हणून खेडेगावाचा कारभार चालत असते. न्यायनिवाडा हा गोत सभेत होईल. एखादा वाद हा मिटत नसेल तर त्यासाठी त्याचा न्याय राजाच्या प्रधान मंडळाकडे अथवा काही वेळेस राजाकडे मानला जाई. त्यासाठी गावात गोतसभा बोलवली जाई त्यात बारा बलुतेदारांसह पाटिल हे सर्व उपस्थित असत. त्यात जो निवाडा होईल त्याची सनद सरकारकडून घ्यावी लागे. याची अनेक उदाहरणे शि.प.सा.स. मध्ये व शिवछत्रपतींची पत्रे खंड १ व २ तसेच संभाजीकालीन पत्रसारसंग्रह व शिवचरित्र साहित्य, मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात पहाय मिळतात. ठोकळ माणाने जरी पाहता गावात पाटलाला शेतीच्या उत्पन्नावरील वाटा कर स्वरुपात शेतकऱ्यांकडून मिळे. तेली, तांबोळी, लोहार, सुतार, चांभार, कोष्टी, कोळी, माळी, मांग, कुंभार, न्हावी, या बलुतेदारांकडून ही वस्तु स्वरुपात कर मिळत असे. गावातील यात्रेतून कर, उत्सवातुन कर वा त्यात पहिला मान हा हि मिळत असे. खेडेगावातील प्रत्येक उत्सवात, गावात पहिला माण हा पाटलाचाच असे. सरकारी अधिकारी आला तर त्याला नगर करण्याचा भेट देण्याचा पहिला अधिकार पाटलाचा नंतर कुलकर्णी यांचा असे. काहि वेळेस पाटिलकीचा दुमाला केला गेलेला असे त्यात दोन भाग पडलेले असत तर त्यावेळेस शिरस्त्याप्रमाणे मानपान, हक्क, मिळकत सर्व गोष्टी दोघांत वाटल्या जात.
संदर्भ:-
¤ भा.इ.स.म. तृतीय संमेलनवृत्त पान ५१
¤ Administrative System of Maratha डाॅ सुरेंद्रनाथ सेन
मराठी अनुवाद
¤ मराठ्यांची प्रशासकीय व्यवस्था- सदाशिव शिवदे
0 Comments