*आमवात - एक नकोसा सोबती*
'संधिवात ' हा विकार फक्त वय झाल्यानंतर होणारा आजार आहे, असा समज आपल्या समाजात आहे .परंतु तरुण वयात , विशेषतः स्त्रियांमध्ये आढळणारा सांध्यांचा जटील आजार म्हणजे *आमवात*.
'संधी' म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जिथे एकत्र आलेली असतात ती जागा . सांध्यामध्ये वेगवेगळ्या स्नायूंच्या साहाय्याने ,संबंधित हाडे जोडली जातात. त्यामुळे त्या त्या सांध्यात , विशिष्ट प्रकारच्या हालचाली करण्याची नैसर्गिक क्षमता असते.
आयुर्वेदाच्या दृष्टीने 'कफदोष' हा सांध्यातील वंगणा प्रमाणे काम करतो, तर 'वातदोष' हा सांध्यांच्या हालचालीसाठी आवश्यक असतो.
वयोपरत्त्वे सांध्यातील वंगणाप्रमाणे असणारा कफदोष कमी होतो ,त्यामुळे सांध्यांची हालचाल करताना, सांधे एकमेकावर घासले जातात. त्यामुळे हाडांची झीज होते व हालचाली करताना सांध्यात वेदना होतात, कट्कट् असा आवाज येतो,सूज येते यालाच 'संधिवात' असे म्हणतात. संधीवातामध्ये सांध्याशी संबंधित नसणारी ताप ,
तोंडाला चव नसणे,मळमळ,अंग जड होणे अशी लक्षणे आढळत नाहीत.
आमवातात संधीवातापेक्षा वेगळ्या प्रकारची कारण परंपरा आढळते. आपण घेतलेल्या आहाराचे सर्वप्रथम रसधातूत रूपांतर होते. हा रसधातू सांध्यातील कफदोषाचेही पोषण करतो. अग्निमांद्य किंवा अन्य कारणामुळे आहाराचे नीट पचन झाले नाही तर , रसधातुत पूर्णपणे न पचलेल्या आहाराचे अंश राहतात . आयुर्वेदाच्या भाषेत यालाच 'आम' असे म्हणतात. हा 'आम' रसधातूद्वारे सर्व शरीरात पसरतो.
विशेषतः जेव्हा हा 'आम' सांध्यात जाऊन अडकतो आणि सांध्यामध्ये वात दोषामुळे होणाऱ्या हालचालींना अडथळा आणतो , तेव्हा सांध्यामध्ये सूज, तीव्र वेदना, जखडलेपणा, लालसरपणा अशी लक्षणे दिसतात.
आमवाताची सुरुवात बरेचदा बोटांची पेरे, मनगटे अशा छोट्या सांध्यांपासून होते. वेदना संचारी स्वरूपाच्या, म्हणजे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या सांध्यात वेदना होताना आढळतात. सकाळी उठताना लक्षणे तीव्रतेने जाणवतात, यालाच 'मॉर्निंग स्टिफनेस' असेही म्हटले जाते.
आमदोष सांध्यांशिवाय कफाच्या अन्य स्थानातही पोहोचत असल्यामुळे, आमवातात सांध्यातील लक्षणा बरोबरच इतर सार्वदेहिक लक्षणे आढळतात.
विशेषतः बारीक ताप येणे, मळमळ, उलटीची भावना, तोंडाला चव नसणे, जास्त तहान लागणे ,आळस येणे, अंग जड होणे, अन्न नीट न पचणे,जिभेवर चिकटा येणे ,संडासला चिकट होणे अशा तक्रारी घेऊन, सुरुवातीच्या स्थितीतील रुग्ण येतात.
जीर्ण अवस्थेत मात्र कायमस्वरूपी हातापायाची बोटे वाकडी होणे, सांध्यांचा आकार बदलणे,कार्यक्षमता नाहिशी होणे इथपर्यंत विकृती पोहोचते. जीर्ण आमवातात हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो.
विशेषतः तरुण स्त्रिया, या रोगाच्या जास्त प्रमाणात शिकार होतात. स्त्रियांमध्ये ऋतुचक्र,गर्भारपण, प्रसूती आणि
स्तनपान देणे या
क्रियांमध्ये , रसधातूवर सर्वात जास्त ताण पडतो. म्हणूनच स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात तसेच सगर्भावस्थेत पुरेशी विश्रांती व योग्य आहार घेणे फारच आवश्यक आहे. प्रसूतीनंतर दीड महिना विश्रांती, तेलाचे मालिश ,शेक व पथ्यपालन या गोष्टी करणे ,स्त्रीच्या भावी आरोग्याच्या दृष्टीने नितांत गरजेचे आहे .
*आमवात होण्याची कारणे समजावून घेणे आणि ती टाळणे गरजेचे आहे . एकदा आमवात झाल्यावर त्याची चिकित्सा खूप दीर्घकाळ घ्यावी लागते आणि तरीही हा नकोसा सखा ,आपली सोबत सोडायला तयार नसतो*.
'अग्नि' म्हणजेच सर्वसामान्य भाषेत पचनशक्ती मंद करणारी सर्व कारणे, आमवातालाही कारण ठरू शकतात.
भूक लागलेली नसताना जेवणे ,
पहिले अन्न पचलेले नसताना पुन्हा त्यावरच खाणे ही त्याची काही सामान्य उदाहरणे आहेत.
*विरुद्ध आहार* व
*विरुद्ध-चेष्टा* , ही आयुर्वेदाने आमवाताची सांगितलेली विशेष कारणे आहेत. जी अनेकांच्या रोजच्या जगण्यात ,अगदी सहजपणे घडताना दिसतात.
दूध, चहा, कॉफी अशा दुधाच्या वस्तुंबरोबर चिवडा, फरसाण ,बिस्किटे, टोस्ट ,पोळी या मीठ असलेल्या वस्तू नियमितपणे खाणे, दूध आणि फळे एकत्र करून बनवलेले शिकरण, फ्रुटसलाड, मिल्कशेक या वस्तू अतिशय पौष्टिक म्हणून, सर्वत्र
आवडीने खाल्ल्या जातात. पंजाबी डिश म्हणून अतिप्रसिद्ध झालेल्या प्रकारात तर भाज्या ,फळे ,दही, साय ,टोमॅटो, पनीर,चीज हे सर्व पदार्थ एकत्र केले जातात. ही सर्व विरुद्ध आहाराची नेहमी आढळणारी उदाहरणे आहेत .
जेवणानंतर लगेच झोपणे ,जेवल्यानंतर आंघोळ करणे, व्यायाम करणे,
जेवण पूर्ण झाल्यावर ,शेवटी पचायला सर्वात जड अशी स्वीटडिश खाणे हे सर्व *क्रमविरुद्ध* आहे.
दुपारी शाळेतून घरी आल्यावर पोटभर जेवून, नियमित स्विमिंग किंवा नाचाच्या क्लासला जाणाऱ्या मुले- मुली, पुढे आमवाताची शिकार होऊ शकतात.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या अतिथंड वस्तू बाहेर काढून ,लगेच मायक्रोवेव्हमध्ये गरम करणे , दही गरम करणे हे सर्व *संस्कार विरुद्ध* आहे.
विरुद्ध आहार -विहाराच्या वरील सवयी अग्नीला बिघडवणाऱ्या आहेत. दुर्दैवाने आज समाजात या सर्व चुकीच्या सवयींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. लोकांना याविषयी जागृत करत राहणे, हाच यावरील सर्वात चांगला उपाय आहे असे वाटते.
*सतत चिंता करणे* हा ही रसधातूला बिघडवणारा व आमवाताला कारण ठरणारा महत्वाचा घटक आहे .
आपण संधिवात व आमवात यातला मूलभूत फरक समजून घेतला, त्यामुळे दोन्हीच्या चिकित्सेतही फरक असणार , हे उघडच आहे .
*आमाचे पचन करणे, ही आमवात चिकित्सेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे 'लंघन' ही सर्वात महत्त्वाची गोष्ट निग्रहाने करावी लागते*. लंघन म्हणजे कडकडीत उपास करणे किंवा गरजेनुसार *केवळ गरम पाणी ,मुगाचे कढण, भाताच्या, ज्वारीच्या लाह्या यासारख्या हलक्या आहारावर राहणे*.
प्रत्येक रोग्याच्या अवस्थेप्रमाणे सांध्यातील लाली, सूज, वेदना ही स्थानिक लक्षणे तसेच अरुची, मळमळ,ताप ही लक्षणे कमी होईपर्यंत ,एक -दोन- तीन किंवा अधिक दिवसही अशा प्रकारे लंघन, वैद्यांच्या सल्ल्यानुसार करावे लागते.
हल्लीच्या काळात रोग्याला लंघन करणे खूप जिकिरीचे वाटते, पण *केवळ योग्यप्रकारे लंघन केल्यामुळे ,सर्व शरीरातील आमाचे पचन होते. रसधातू शुद्ध होतो ,अग्नि सुधारतो आणि चिकित्सेतील यशाचा मार्ग खुला होतो*.
दुसरी महत्त्वाची चिकित्सा म्हणजे *रुक्ष स्वेद*. आमवातातील वेदना, जखडलेपणा कमी करण्यासाठी रुक्ष स्वेद खूपच उपयुक्त ठरतो. *वाळूची पुरचुंडी, जाड्या मिठाची पुरचुंडी, गरम पाण्याचे पिशवी, तवा किंवा इस्त्रीवर गरम केलेले जाड कापड* अशा प्रकारे कोरडा शेक
करणे, म्हणजे *रुक्ष स्वेद*. आमवाताच्या रुग्णांनी सुरुवातीच्या अवस्थेत तरी तेलाचा मसाज करणे ,वाफ घेणे किंवा पाण्यात अवयव बुडवून ओला शेक घेणे टाळावे.
लंघन पूर्ण झाल्यावर वैद्यांच्या सल्ल्यानुसार वेगवेगळी औषधे वापरता येतात. *लंघन न करता लगेच औषध सुरू केल्यास, ते औषधही पचत नाही आणि त्यापासूनही पुन्हा आम तयार होतो*.
आमवाताच्या चिकित्सेसाठी गुग्गुळाचे विविध प्रकार, सुंठ, गुळवेल, दशमूळ,एरंडमुळ, रास्ना,निर्गुंडी ,बिब्बा
अशी असंख्य औषधे आयुर्वेदात उपलब्ध आहेत. *परंतु औषधांचा वापर रुग्णाच्या अवस्थेनुरूप ठरत असल्याने , स्वतः जाहिराती वाचून ही औषधे घेण्याचा मोह पूर्णपणे टाळावा*. त्यासाठी योग्य वैद्यांचाच सल्ला घ्यावा .
*एरंडेल* हे आमावातातले रामबाण औषध आहे. आमदोषाला गुदावाटे शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी, उत्तम विरेचन द्रव्य म्हणून
एरंडेलाचा फारच चांगला उपयोग करून घेता येतो. आमवाताच्या रुग्णाने रोजची पोळी करताना, एका पोळीच्या कणकेत एक चमचा,या प्रमाणात एरंडेल मिसळून वापरण्यास हरकत नाही .
सुंठ,बडीशेप काढ्यातूनही एरंडेल घेता येते, अर्थात आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानुसारच ते
घ्यावे.
आमपाचन झाल्यावर सांध्यात आलेला रुक्षपणा घालवण्यासाठी, पोटात घ्यायला विविध औषधांनी सिद्ध केलेली तेले- तुपे वापरली जातात त्याला ,*स्नेहपान* असे म्हणतात. ज्याप्रमाणे यज्ञात थोडे- थोडे तूप टाकत राहिले की अग्नी प्रज्वलित होतो, तसेच थोड्या- थोड्या प्रमाणात 'स्नेहपान' केल्याने अग्नीची दीप्ती होते, तसेच आमाचे शरीरावर होणारे विपरीत परिणामही दूर होतात.
जीर्ण आमवातात होणाऱ्या सांध्यांच्या कायमस्वरूपी विकृती, हृदय विकृती टाळण्यासाठी या सिद्धघृतांचा ,म्हणजेच औषधी तुपांचा अमृतासारखा उपयोग होतो.
आमवाताच्या विविध अवस्थांनुसार आयुर्वेदाच्या पंचकर्मापैकी *बस्ती* ही चिकित्सा अतिशय लाभदायी आहे. बस्ती म्हणजेच गुदमार्गाद्वारे तेले ,काढे यांचा वापर करणे.
निर्गुंडी,एरंड,वेखंड,
आंबेहळद, सुंठ अशा औषधांच्या *लेपाचा व पोल्टिसांचा* वेदना ,सूज कमी करण्यासाठी उपयोग करून घेता येतो.
औषधासोबतच योग्य आहार आणि व्यायामाची जोड ,या कष्टसाध्य आजारावर मात करण्यासाठी अत्यावश्यक आहे. अग्नी प्रज्वलित करणारा, रसधातुला बल देणारा आहार असावा.
ज्यामध्ये जुनी धान्य, भाजलेली धान्य, मूग, जव, कुळीथ, आले, लसूण, पडवळ, कारले अशा भाज्या, गरम पाणी, मध, तूप, चुन्याची निवळी, कडधान्याची कढणे, भाकरी ,फुलका, लाह्या, खाकरा, मेतकूट, भाजणी असे भाजलेले पदार्थ यांचा, वैद्यांच्या सूचनेनुसार आहारात समावेश असावा.
अतिथंड, शिळे, जड पदार्थ, रात्री उशिरा जेवणे टाळावे .रात्री लवकर आणि कमी जेवावे. एसी, ओल असणाऱ्या जागा टाळाव्या.उबदार अंथरूण ,पांघरूण असावे. आठवड्यातून किमान एक लंघन करावे. पंधरा दिवसातून एकदा वैद्यांच्या सल्ल्याने एरंडेल घ्यावे.
*अग्नी चांगला ठेवण्यासाठी ,योग्य वेळी योग्य व्यायाम यासारखे परम औषध नाही*. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी क्षमतेनुसार सांध्यांचे व्यायाम, योगासने, प्राणायाम यासारखे उपक्रम बल टिकवण्यासाठी व डिफॉर्मिटी टाळण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.
सुरुवातीच्या अवस्थेतच आमवाताचे निदान करून योग्य चिकित्सा वेळेवर केल्यास, त्यापासून होणारा दीर्घकाळचा त्रास नक्कीच आटोक्यात आणता येतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता वरील लक्षणे आढळल्यास ,त्वरित जवळच्या तज्ञ वैद्यांची मदत घेणे, अत्यावश्यक आहे, नाहीतर हा *आमवात नामक सोबती* आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही.
दि. 22 जुलै 2022
0 Comments