*तंजावर च्या मराठेशाहीचा दैदिप्यमान इतिहास*
- *©श्री अभिजित उद्धवराव निकम*,सातारा.
तंजाऊर किंवा आताचे तंजावर, हे आजच्या तामिळनाडू मधील एक प्रमुख शहर व जिल्ह्याचे ठिकाण. काही ठिकाणं ऐतिहासिक घटनांनी इतकी भारलेली असतात की तिथं गेल्यावर माणूस आपला वर्तमान आणि भविष्यकाळ हरवून बसतो, उरतो तो फक्त दैदिप्यमान असा भूतकाळ. तंजाऊर हे त्यापैकीच एक. तंजाऊर हे एक ऐतिहासिक ठिकाण नसून प्रत्यक्ष इतिहासपुरुष आहे. जो तुम्हाला आपल्या मांडीवर बसवून हजारो वर्षांची गोष्ट सांगतो. तुम्हाला भारावून टाकतो. इथला प्रत्येक चिरा बोलतो, इथली हवा व्यक्त होते आणि इथली माती तुम्हाला नतमस्तक व्हायला भाग पाडते.
कावेरी नदीच्या तीरावर वसलेलं हे शहर एकेकाळी जगातील सर्वात उंच असलेले आणि आता युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं बृहदेश्वर मंदिर या करता विशेष करून जाणलं जातं. तामिळ दंत कथेनुसार *तंजा* नावाच्या एका दैत्याचा वध विष्णु चा अवतार असलेल्या *नीलमेघ पेरूमल* याने केला आणि त्या ठिकाणाचे नाव पडले *तंजाऊर*. महान अशा चोळ राजांचा वारसा तंजावरास लाभलाय. आणि अशा तंजावरच्या इतिहासात मराठा राजांचा जवळपास 180 वर्षांचा(1674-1855) कालखंड म्हणजे एक मानाचे पानच आहे. स्वराज्याची राजधानी रायगड पासून तंजावर जवळपास 1360 किमी एवढे आहे. मराठ्यांचे रायगड ते तंजाऊर असे थेट कनेक्शन नसून ते व्हाया बेंगळुरू असे आहे, आणि तेही तितकेच रोचक आहे. व्यंकोजी राजांचे वंशज प्रिन्स बाबाजीराजे आणि प्रिन्स शिवाजीराजे आजही तंजाऊर मध्ये मराठेशाहीचा वारसा चालवत आहेत, आणि आजही मराठी संस्कृतीची जोपासना महाराष्ट्राबाहेर करत आहेत.
*#तंजाऊर चे मराठा राजघराणे:*
व्यंकोजीराजे(इ.स.1674) ते शिवाजी दुसरा(इ.स.1855)
*श्रीमंत व्यंकोजीराजे शहाजी राजे भोसले*(1674 ते 1684)
दक्षिणेतील या महत्त्वाच्या शहरात मराठा सत्तेचा भगवा फडकवला तो छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजी उर्फ एकोजी राजे यांनी. सन 1674 च्या सुमारास आदिलशाहीचे सरदार असलेल्या व्यंकोजी राजांनी अलागिरी या नायकाचा पराभव करून तंजावर काबीज केले.या घटनेचा उल्लेख *भोसलावंसम्* या संस्कृत हस्तलिखिता मध्ये आढळतो. नंतर व्यंकोजीनी आदिलशाही विरुद्ध बंड करून त्यांनी स्वतःला तंजाऊर चा राजा घोषित केले.
व्यंकोजी राजांनी 1674 ते 1684 असा 10 वर्ष तंजाऊर चा कारभार पहिला. हा कालखंड तामिळ तसेच ब्रिटिश इतिहासकारांच्या मते वेगवेगळा आहे.दक्षिण दिग्विजय साकारत असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या ह्या बंधू ची भेट घेतली. नदीच्या अलीकडे तंजाऊर तर पलीकडे महाराजांची छावणी होती. काही इतिहासकारांच्या मते महाराजांनी शहाजीराजांच्या दक्षिणेकडील जहागिरीतील अर्धा हिस्सा व्यंकोजीराजांकडे मागितला. व्यंकोजीराजांना तो खचितच मान्य होणार होता. महाराजांचा पूर्वइतिहास जाणून असलेल्या व्यंकोजीनी रात्रीच्या अंधारात नावड्याच्या खांद्यावर बसून पोबारा केला. महाराज दक्षिण दिग्विजयावरून परतले आणि तंजाऊर व्यंकोजीराज्यांच्या अधिपत्याखाली वाढू लागले, बहरू लागले. तंजाऊर च्या राजभाषेत मराठीचा समावेश झाला, आणि तेलुगू आणि तामिळ यांच्या बरोबरीचे स्थान मिळाले. स्वतः व्यंकोजीराजानी रामायणाचा तेलगु मध्ये अनुवाद केला. व्यंकोजी राजांनंतर त्यांचा मुलगा शहाजी किंवा शाहुजी दुसरा हे गादीवर आले.
*©श्री अभिजित उद्धवराव निकम*,सातारा.
*श्रीमंत शहाजीराजे व्यंकोजीराजे भोसले (दुसरा)(इ.स.1684-इ.स.1812)*
आलमगीर औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारून मराठ्यांचा स्वाभिमान जागा केला. रायगडचा ताबा मोगलांकडे गेल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांनी आपला तंजाऊर स्थित भाऊ शाहुजी दुसरा याच्या मदतीने जिंजी चा किल्ला जिंकला आणि मराठ्यांची राजधानी *जिंजी* येथे हलवली. अशा प्रकारे शाहुजी दुसरा यांनी स्वराज्याचा स्वातंत्र्यसंग्राम तेवत ठेवण्यास मदत केली. शाहुजी दुसरा यांनी उत्तरार्धात असीम पराक्रम दाखवत मुघलांचा वाराणसी पर्यंतचा मुलुख मारला. या पराक्रमाचा उल्लेख *शाहसराजा विलास* या नाटकात आढळतो. पुढं इ.स 1712 मध्ये शाहुजी दुसरा यांनी राजत्याग करून संन्यास घेतला असा उल्लेख *अद्वैत किर्तन* यामध्ये आढळतो. त्यांच्यानंतर त्यांचा भाऊ सरफोजी पहिला गादीवर आला.
*श्रीमंत सरफोजीराजे व्यंकोजीराजे भोसले*(इ.स 1712 ते इ.स 1728)- तंजाऊर ने यांच्या काळात शांतता अनुभवली आणि कला आणि साहित्य यांचा खूप विकास झाला.शिवभारत या शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित संस्कृत हस्तलिखिताचे भाषांतर तामिळ भाषेत शिवचरितम असे करण्यात आले. त्यांच्या नंतर त्यांचा धाकटा भाऊ तुकोजी गादीवर आला.
*श्रीमंत तुकोजीराजे व्यंकोजीराजे भोसले*(इ.स 1728 ते इ.स 1736)- तुकोजीराजांनी हिंदुस्थानी संगीताचा परिचय प्रथमच दक्षिणेस करून दिला. त्यांनी संगीतावर आधारित *संगीत समामृत* या ग्रंथाची निर्मिती केली.त्यांच्या मृत्यूनंतर तंजाऊर मध्ये काही काळ अस्थिरता निर्माण झाली. एकोजी दुसरा यांनी एक वर्ष राज्य पाहिल्यानंतर प्रतापसिंह यांनी तंजावर ला स्थिरता मिळवून दिली.
*श्रीमंत प्रतापसिंहराजे भोसले(इ.स 1739 ते इ.स 1763)* यांच्या काळात तंजाऊर ने ब्रिटिश आणि फ़्रेंच यांच्यातील सप्तवार्षिक युद्ध अनुभवलं.त्यांनी या युद्धात ब्रिटिशांची मदत केली. यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा तुळजाजी यांनी राज्यकारभार पहिला.
*श्रीमंत तुळजाजीराजे भोसले* (इ.स 1763-1773 आणि इ.स 1776-1789) यांच्या काळात तंजावर च्या मराठे शाहीला दोन मोठे झटके बसले.एक म्हणजे अर्काट च्या नवाबाने काही काळासाठी घेतलेला तंजावर चा ताबा आणि दुसरं म्हणजे ब्रिटिशांचे स्वीकारावं लागलेलं मांडलिकत्व. तुळजाजीराजे निपुत्रिक असल्याने त्यांनी *सातारच्या* गादीकडून आपला वारस दत्तक घेतला आणि त्याचे नाव ठेवले *सरफोजी दुसरा* तुळजाजीराजांचा भाऊ अमरसिंह आणि सरफोजी दुसरा यांच्या मध्ये तख्तासाठी लढाई झाली पण ब्रिटिशांच्या मदतीने तैनाती फौजेचा स्वीकार करून सरफोजी दुसरा यांनी तंजावर च्या राजगादी वरील आपला हक्क कायम ठेवला.
*श्रीमंत सरफोजीराजे भोसले(दुसरा)*(इ.स. 1787 ते इ.स. 1793 आणि इ.स. 1798 ते इ.स. 1832) यांचा कालखंड हे तंजावर च्या *मराठेशाहीचे सुवर्णयुग* म्हणायला हरकत नाही. काही इतिहासकार तर असे म्हणतात की चोळ सम्राट राजराजा याच्यानंतर सरफोजीराजे यांची कारकीर्द तंजावर च्या इतिहासात दैदिप्यमान अशी ठरली. सरफोजीराजांचा *जन्म सातारच्या राजघराण्यात झाला.* त्यांना श्रीमंत तुळजाजीराजे यांनी दत्तक घेतले. सरफोजीराजांना आपल्या काकांशी म्हणजेच तुळजाजीराजांच्या सावत्र भावाशी अमरसिंहशी गादी साठी सत्ता संघर्ष करावा लागला. ब्रिटिशांच्या मदतीने सरफोजीराजे यात विजयी झाले आणि त्यांनी तब्बल 40 वर्ष तंजावूर चा कारभार पहिला. 5 सुभे, 5 हजार हुन अधिक गावं एवढा मुलुख त्यांच्या आख्यातरीत होता. सरफोजीराजे यांचा कार्यकाळ म्हणजे तंजावर च्या कला, साहित्य, नाट्य क्षेत्राला पडलेलं जणू एक सुंदर स्वप्नच म्हणून मानला गेला. सरफोजीराजांना मराठी,संस्कृत,तेलुगू,कन्नड,उर्दू, तामिळ सारख्या देशी भाषांबरोबरच इंग्रजी, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच,जर्मन,डॅनिश,इतक्या परदेशी भाषांमध्ये ही ते पारंगत होते.
*सरफोजींचे तंजाऊर संस्थानातील योगदान*
*#सरस्वती महाल ग्रंथालय-* हे ग्रंथालय जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या ग्रंथालयांपैकी एक आहे. नायक राजांनी जरी त्याची स्थापना केली असेल मात्र त्यास सरफोजिनी नावारूपाला आणले असे म्हणल्यास अतिशीयोक्ती ठरणार नाही. वेदांत, व्याकरण, स्थापत्य, विविध कला, संगीत,नाट्यशास्त्र, अश्वपरिक्षण,गजशास्त्र,कामशास्त्र खगोलशास्त्र,वैद्यकशास्त्र इत्यादी विविध विषयांवरील 47,000हस्तलिखिते,1लाखाहून अधिक संदर्भ ग्रंथ, 2,55,000 मोडीलिपीतील कागदपत्र यासर्वांनी हे ग्रंथालय समृद्ध आहे. सरफोजींचा व्यासंग एवढा अफाट की त्यांनी भारतभरात विविध पंडितांकडून अत्यंत दुर्मिळ ग्रंथ संग्रहित केले, तसेच त्यांनी त्याकाळी प्रसिद्ध असलेले विविध देशांच्या विविध भाषांमधील 4000 हुन जास्त ग्रंथ संग्रहित केले. सरफोजी राजे हे एशियाटिक सोसायटी चे मानद सभासद होते, आणि याचा बराच लाभ त्यांना ग्रंथ संग्रह करताना झाला.हा मोलाचा ठेवा आजही या सरस्वती ग्रंथालयात पाहायला मिळेल. काही विशेष उदाहरण द्यायचे झाल्यास, प्रत्यक्ष शिवछत्रपतींच्या आज्ञेने कवी परमानंदानी *शिवचरित्र* रचले त्याची प्रत सुद्धा उपलब्ध आहे. अवघ्या महाराष्ट्राला ही सरफोजिनी दिलेली देणगीच म्हणावी लागेल. कारण याची प्रत फक्त संपूर्ण याच सरस्वती ग्रंथालयात होती आणि याची पारायणे सरफोजींच्या काळात होत असत असे लोक सांगतात.
*शब्दार्थचिंतामणी* आणि *कथात्रयी* हे दोन विस्मयकारी ग्रंथ तर या ग्रंथालयाची शान वाढवतात. *शब्दार्थचिंतामणी* हा संस्कृत ग्रंथ जर डावीकडून वाचला तर रामायण आहे आणि उजवीकडून वाचला तर महाभारत आहे. *कथात्रयी* तर त्याच्या एक पाऊल पुढे जाते, हा ग्रंथ डावीकडून वाचल्यास रामायण आणि उजवीकडून वाचल्यास महाभारत आहे आणि शब्दशः अर्थ लावल्यास भागवत धर्म सांगणारा आहे.आशा ग्रंथांची रचना करणे आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडे आहे.
सारफोजिनी आपली तिजोरी रीती करून हा अमूल्य खजिना आपल्यासाठी खुला केला हे त्यांचे अवघ्या साहित्य प्रेमींवर अनंत उपकारच आहेत.एवढच न्हवे तर सरफोजिनी देवनागरी लिपीतील देशातील पहिला छापखाना दक्षिणेत प्रथमच तंजावर ला सुरू केला.
*#नाट्यकला-*
नाटक हा प्रकार दक्षिणेमध्ये रुजवला तो तंजाऊर च्या मराठ्यांनी.मराठी भाषेतील पाहिलं नाटक हे महाराष्ट्रातील मराठी रंगभूमीवर उभे राहिले नसून ते तामिळनाडू च्या तंजाऊर च्या मराठी रंगभूमीवर प्रथम उभं राहिले, हे ऐकून आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. दक्खनी मराठी भाषेत 12 हुन अधिक नाटके लिहिली गेली व ती रंगभूमीवर त्याचे प्रयोग देखील करण्यात आले. सरफोजींच्या काळात या साठी राजाश्रय दिला गेला. या नाट्यकलेचे जतन आजही तंजाऊर मध्ये केले जाते.
दक्खनी मराठी ही भाषा 350 वर्षाहुन अधिक काळ तंजावर मध्ये बोलली जाते. आधुनिक मराठी चे हे प्राचीन रुपडं तेवढंच लोभस आहे. व्यंकोजी राजांचे वंशज आणि तमाम मराठी बांधव तामिळ बरोबर या दक्खनी मराठीचा देखील तेवढाच अभिमान बाळगतात.
*#पाककला*- सर्वांच्या आवडीच्या सांबार ह्या दाक्षिणात्य पाककृतीचा आणि मराठेशाहीचा खूप जवळून संबंध आहे. वास्तविक सांबार ही मराठेशाहीची अवघ्या भारतवर्षास चविष्ट अशी देणगी आहे. छत्रपती संभाजी महाराज आपले तंजावरस्थित चुलत बंधू शाहुजीराजे (दुसरे) यांची भेट घ्यायला तंजाऊर ला गेले असता, तिथे स्वयंपाक्याने आमटी मध्ये अमसुला ऐवजी चिंचेचा वापर केला .ही नवी पाककृती संभाजी महाराजांना खूप आवडली. आणि म्हणूनच याची आठवण म्हणून शाहुजी (दुसरे) यांनी या पाककृतीचे नाव *संभा चा आहार सांभार/सांबर* असे ठेवलं आणि तेच पुढं प्रसिद्ध झाले.
*#वैद्यकशास्त्र-* सरफोजीराजे उत्तम प्रकारे मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करू शकत होते. त्याचे पुरावे म्हणजे त्यांनी शस्त्रक्रियेसाठी वापरलेली उपकरणं आजही सुस्थितीत आहेत. तसेच त्यांनी रुग्णांची काढलेली बारीक टिपणे, त्यांना केलेला उपचार आणि पथ्ये याच्या नोंदी देखील सापडतात. सरफोजीराजे इतर राजाहून निराळे होते याचेच हे द्योतक आहे.
*#शिलालेख-* जगातील कोणत्याही भाषेत सर्वात मोठा शिलालेख कोणता असेल असा प्रश्न पडला तर त्याचं आपण अभिमानाने उत्तर देऊ शकतो. तो शिलालेख आहे तंजावर च्या बृहदेश्वर मंदिराच्या भिंतीवर कोरलेला देवनागरी लिपीतील मराठी शिलालेख. यामध्ये अगदी शहाजीराजांच्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजीमहाराज ते थेट सरफोजीराजांपर्यंत मराठेशाहीचे धुरंधर यांच्या पराक्रमाचा उल्लेख आहे.
*#शैक्षणिक सुधारणा* दक्षिण भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा मान देखील सरफोजीराजांना जातो. शिक्षणाची कवाडे मुलींसाठी उघडून सरफोजिनी नवा आदर्श घालून दिला जो पुढं कोल्हापूर संस्थानात जवळपास 150 वर्षा नंतर राजर्षी शाहू छत्रपतींनी पूर्णत्वास नेला.
*#नागरी सुविधा* -सरफोजिनी आपल्या कार्यकाळात भाविकांसाठी ठिकठिकाणी निवासस्थाने निर्माण केली. त्यांनी तंजाऊर मध्ये प्रथमच शहरात जमिनीखालून बंदीस्थ नाले बांधले.
*#उत्तरकाळ* -
जवळपास चाळीस वर्षांची सुवर्ण अक्षरात लिहिता येईल अशी कारकीर्द सरफोजींच्या निधनाने समाप्त झाली. त्यांच्या नंतर 1855 मध्ये ब्रिटिशांनी तंजाऊर संस्थान खालसा केले आणि 1674 ते 1855 असा 180 वर्षांचा मराठेशाहीचा दैदिप्यमान असा सुवर्णकाळ संपुष्टात आला.
त्यानंतरच्या नामधारी राज्यकर्त्यांनी देखील कोणत्या ना कोणत्या प्रकारे देशसेवा चालू ठेवली. 1962 च्या युद्धाला मदत म्हणून 2000किलो सोनं दान केले. भूदान चळवळीच्या वेळी 100 एकर हुन अधिक जमीन दान केली.
*तंजाऊर* च्या मराठेशाहीचा हा कल्पनातीत, अगम्य आणि अभिमानास्पद इतिहास वाचून कोणत्याही मराठी माणसाचा *ऊर* भरून आल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांनी युद्धाशिवाय काहीच केले नाही असे म्हणणाऱ्या लोकांच्या श्रीमुखात लगवण्यासारखा असा हा मराठेशाहीचा बुलंद इतिहास आहे
*आपला हा गौरवशाली इतिहास जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील मराठी माणसापर्यंत पोहचवूयात.* चला एकदा तंजाऊर ला जाऊयात, इथल्या मातीसमोर नतमस्तक होऊयात.🙏🏻🙏🏻
*#संदर्भ*-
-तंजावर च्या मराठेशाहीचा इतिहास, विकिपीडिया.
-ABP माझा तंजावरचे मराठे डॉक्युमेंटरी.
*©श्री अभिजित उद्धवराव निकम*,सातारा.
0 Comments