*किल्ले राजगडाची संजीवनीचे स्थापत्यशास्त्र*
गुंजवणी, कानंदी, वेळवंडी आदी नद्यांच्या खो-यात स्वपराक्रमाच्या कथा व शिपराक्रमाच्या गाथा सांगत ताठ मानेने उभा असलेला किल्ले राजगड शिवछत्रपतींच्या दुर्गस्थापत्य शास्त्राचे सर्वोत्कृष्ट असे उदाहरण आहे. पद्मावती, सुवेळा, संजीवनी अशा माच्यांनी बेलाग आणि दुर्गम बनलेल्या याच दुर्गाच्या अंगी स्थापत्यशास्त्राचा एक लढाऊ, मजबूत आणि तितकाच देखणा अलंकार एका स्थापत्यविषारद राजाने मोठ्या गौडकौतुकाने चढवला आहे तो म्हणजे ‘संजीवनी’...
मुरूंबदेवाच्या पश्चिमेकडील एका धावत जाणा-या डोंगरसोंडेवर भल्याभल्यांची मती गुंग करणारा संजीवनी नावाच्या स्थापत्यशास्त्राचा एक सर्वोत्तम आराखडा ऐन डोंगरकड्यांवर मोठ्या कुशलतेने रेखाटला गेला आहे...
साधारण तीन टप्प्यांत उतरणाऱ्या या माचीचे बांधकाम शत्रूसैन्यासाठी एक खास भूलभुलैयाच असून तट,बुरूज,चिलखती बुरूज, नाळ, माची, फांजी, जंग्या, दरवाजे, चोर दरवाजे अशा नानाविध दुर्गवैशिष्ट्यांनी इथला कोपरा आणि कोपरा अतिशय मजबूत केला गेला आहे. या माचीच्या तीनही टप्प्यांवर असणारी खास आणि स्वतंत्र अशी लढाऊ, जीवनोपयोगी आणि प्रशासकीय रचना या माचीचे खास वैशिष्ट्यच असून एका दुर्गप्रेमी राजाच्या दुर्गस्थापत्यावर खास पैलू टाकणारी आहे. राजांनी राजगड घडवला अस आपण नेहमीच म्हणतो परंतू राजांनी ऐन उमेदीत अगदी जीव लावून साकारलेल्या त्यांच्या या पहिल्या राजधानीचे अंगप्रत्यय त्यांच्याच दुर्ग नजरेतून पाहिलं की राजांनी राजगडावर मनापासून प्रेम देखील केलं याची प्रचिती हे विस्मयजनक बांधकाम पाहिले की जागोजागी यायला लागते...
0 Comments