नमस्कार,
गर्भसंस्कार- आधुनिक संशोधनाची पूर्वपिठीका
स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांचे मिलन हे वरवर पाहता एक अनाहूत आणि आतार्किक घटना आहे असे दिसते. वीर्यरूपाने शुक्राणू ( पुरुष बीज) स्त्रीच्या योनीमध्ये स्खलित होतात आणि पूर्णपणे अनोळखी अशा, दूरवर असणाऱ्या, स्त्रीबीजाकडे आर्तपणे धाव घेतात. अंडोत्सर्जन प्रक्रियेने बाहेर पडलेले स्त्रीबीज, आपल्या अज्ञात प्रियकराला भेटायला, गर्भाशय नलिकेत प्रवेश करून आत आत सरकत राहते. हे सारं आपोआप, जाणीव रहित घडतं असं वाटण्यासारखंच आहे.
पण आधुनिक संशोधनाने पुराव्यानिशी उभं केलेलं चित्र काही वेगळंच सांगतंय. या साऱ्या अहेतुक, आपोआप आणि त्यामुळे अनिश्चिततायुक्त अशा घटना मुळीच नाहीत.
पुनरुत्पादनासाठी व प्रजोत्पादनासाठी आवश्यक असणारी प्रत्येक हालचाल, प्रत्येक कृती, घडणाऱ्या घटनांची प्रत्येक पायरी, हे, कोट्यावधी वर्षापूर्वीपासून मोठ्या कल्पकतेने आणि कुशलतेने हेतुपूर्वक रचलेल्या अत्यंत योजनाबद्ध प्रक्रियेचा एक भाग आहे. हे पुढील वर्णनावरून लक्षात येईल.
जीवनाचे सातत्य राखण्याची ही निसर्गाची दैवी रचना आहे.
एका शुक्राणूंच्या विलक्षण अशा जीवनप्रवासाचा विचार करून बघा. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे तो आता त्याच्या आकाराच्या ४ लाख पट एवढा मोठा करून डोळ्यांनी प्रत्यक्ष बघता येऊ शकतो.
मुल गर्भाशयात असतानाच अगदी प्राथमिक अवस्थेतील शुक्राणूंची पेशी, पुढे प्रजोत्पादनासाठी समर्थ असे पुरुष बीज बनण्यासाठी निर्माण झालेली असते. मात्र, जन्माला येऊन मुलाची पौंगडावस्था येई पर्यंत ( साधारण वय वर्षे १२) ते उपलब्ध होऊ शकत नाही.
त्याच्या पिट्यूटरी आणि हायपोथॅलॅमस या मेंदूच्या भागातून येणाऱ्या संदेशामुळे, कशी कोण जाणे पण योग्य वेळी ठराविक वयानंतर शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया, आश्चर्यकारकपणे सक्रिय होते.
मेंदूकडून येणारे हे संदेश वृषणग्रंथी मधल्या टेस्टोस्टिरॉन नावाच्या हाँर्मोनच्या निर्मितीला सुरुवात करतात आणि आज्ञाधारक सेवकाप्रमाणे, तो हार्मोन, वृषण ग्रंथीमध्ये शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया सुरू करतो. ही निर्मिती प्रक्रिया पुढे जवळजवळ संपूर्ण आयुष्यभर चालू राहते.
त्या आदिम प्राथमिक अवस्थेतील पेशींपासून शुक्राणू तयार व्हायला जवळ जवळ दोन महिन्यांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेमध्ये पुरुष बीज पेशींमधील प्रत्येक पेशीतील ४६ गुणसूत्रांपैकी निम्मी, म्हणजे २३ गुणसूत्रे शिल्लक राहतात. पूर्ण विकसित झालेल्या शुक्राणू मध्ये, पुढच्या स्त्रीबीजाशी मिळून त्याला गर्भ निर्मिती करायची आहे ते स्त्रीबीज देखील, अशाच निम्म्या, म्हणजे २३ गुणसूत्रांसह, पहिल्या 'गर्भपेशी'च्या ४६ गुणसूत्रांची संख्या, दूरवर कोठेतरी पूर्ण करण्यासाठी जणू या शुक्राणू ची वाट पाहत आहे. निसर्गाची ही दूरदृष्टी खरंच अचंबित करणारी आहे.
पूर्ण विकसित अशा या शुक्राणू ला एक डोके व शेपटी अशी रचना असते. स्त्रीबीजाशी एकरूप होणाऱ्या 'डोक्या'मध्ये २३ गुणसूत्रे असतात आणि त्यापैकी एक गुणसूत्र (Chromosome) X किंवा Y असते. जे निर्माण होणारा गर्भ, पुरुष होणार की स्त्री याचा निर्णय करते. ही माहिती पूर्वीच्या लेखांमध्ये आली आहे.
ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर, होणाऱ्या 'बाळाचे 'लिंग' ठरवण्याची जबाबदारी, आईवर असते',00 हा गैरसमज नाहीसा होणे अपेक्षित होते व त्याबद्दल विशेषतः आईला दोष देणे बंद व्हायला हवे होते. जे दुर्दैवाने औऔऔऔऔऔऔऔभारतात झालेले दिसत नाही.
आता एक आश्चर्यजनक संशोधन सांगतो, योनीमार्गात असलेल्या शुक्राणूंना, दूरवर गर्भाशय नलिकेत असलेल्या स्त्रीबिजांचा पत्ता समजतो कसा ?
अत्याधुनिक संशोधनामध्ये आढळले आहे की शुक्राणूंच्या डोक्याच्या भागात, नाकात असतात तसे गंध, संवेदना ग्रहण करू शकणारे संवेदनाग्राहक घटक (Receptors) असतात.
संशोधकांचे म्हणणे आहे की हे संवेदना ग्राहक (Receptors) स्त्रीबीजापासून येणारा विशिष्ट गंध ग्रहण करू शकतात व त्याच्या मदतीने स्त्रीबीजापर्यंतचा मार्ग शोधून काढतात.
मागे असणाऱ्या शेपटीच्या सहाय्याने हालचाल करत ते पुढे पुढे सरकत राहतात, व स्त्रीबीजा पर्यंत पोचताना शेपूट हलवत , पाण्यात पुढे सरकणार्या माशाप्रमाणे ही शेपटी अतिशय वेगाने हलत राहते. एक इंच सरकण्यासाठी या शेपटीला एक हजार पेक्षा जास्त वेळा 'वळवळ' करावी लागते. इतका त्याचा वेग प्रचंड असतो. मायटोकाँड्रिया नावाच्या पेशीतला अवयव त्याला ऊर्जा पुरवत असतो.
शुक्राणूंना जिवंत व सुव्यवस्थित राहण्यासाठी शरीराच्या नॉर्मल तापमानापेक्षा कमी तापमान असणे आवश्यक असते. ( शुक्राणूंना शरीराचे तापमान फार काळ सहन होत नाही.) शरीरापेक्षा कमी तापमानात त्यांना राहता यावे यासाठी पुरुषांमध्ये वृषण ग्रंथी या शरीराच्या बाहेर ठेवण्याची निसर्गाची योजना खरोखर 'दैवी'च म्हटली पाहिजे.
या वृषण ग्रंथींमध्ये प्रति दिवशी ५० कोटी (500 Million) एवढे शुक्रजंतू निर्माण होत असतात.
योनीमार्गातून गर्भाशय नलिकेपर्यंतचा प्रवास करताना त्याला आवश्यक असणारं संरक्षण, पोषण देणाऱ्या एका द्रवपदार्था बरोबरच मधूनच कोट्यावधी शुक्राणू योनीमार्गात प्रवेशित होतात.
गर्भाशयाच्या पिशवीचे तोंड घट्ट अशा शेंबडासारख्या स्त्रावाने झाकलेले असते, जे अंडोत्सर्जना दरम्यान स्त्राव सैल झाल्यामुळे मोकळे होते. या मार्गातून जाण्यासाठी शुक्राणू पुरेसे सशक्त असणे आवश्यक असते.
पुढे गर्भाशयाच्या पोकळीत गेल्यावर गर्भाशयाच्या अंतस्तरामध्ये असणाऱ्या वळ्या व उंच-सखल पणामध्ये शुक्राणू सहज हरवून जाऊ शकतात. अशक्त व दुर्बल शुक्राणू या प्रवासात टिकत नाहीत.
स्त्री शरीरासाठी शुक्राणू हे शरीराबाहेरील घटक असतात. त्यामुळे WBC व Macrophages नावाच्या स्त्री शरीरातील संरक्षक पेशी या शुक्रणूंना शत्रू समजतात. या सर्व परिस्थितीशी लढा देत काही विजयी व वेगवान शुक्राणू गर्भाशय नलिकेमध्ये आलेल्या स्त्रीबीजापर्यंत पोचू शकतात.
गर्भधारणेपूर्वी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या 'बीजशुद्धी' संकल्पनेचे महत्त्व येथे अधोरेखित होते, आणि गर्भधारणा होण्यापूर्वीच गर्भसंस्कारांची सुरुवात झाली पाहिजे. या वस्तुस्थितीचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरजही राहत नाही.
अर्थात गर्भधारणेपूर्वी माता-पित्यांवर करावयाचे 'गर्भसंस्कार' यांच्या अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांचे इतरही अनेक पैलू आहेत ते यथानुक्रम येतीलच.
स्त्री शरीरामध्ये गर्भ धारणेसाठी आवश्यक सर्व तयारी अशीच अगोदर पासूनच सुरु झालेली असते.
गर्भाशयात असणारा स्त्रीगर्भ, ५ महिन्यांचा होईपर्यंत, त्या जन्मपूर्व गर्भ शरीरात जवळ जवळ ५० लाखांपर्यंत संख्येने स्त्रीबीजे प्राथमिक स्वरूपात तिच्या अंडकोशांमध्ये तयार असतात. प्रौढ स्त्री मध्ये (पौंगडावस्थेपासून) मेंदूकडून येणाऱ्या संदेशामुळे अंड्याची वाढ व अंडोत्सर्जनाची (Ovulation) प्रक्रिया सुरू होते.
मासिक पाळी आणि अंडोत्सर्जन याविषयीची सविस्तर माहिती पूर्वीच्या लेखांमधून आली आहे.
अंडोत्सर्जनाने बाहेर पडलेले स्त्रीबीज गर्भाशयात जाईल, याची गर्भाशय नलिकेच्या सहाय्याने पुरेपूर काळजी घेतली जाते.
गर्भाशय नलिकेत पोचलेल्या हजारो शुक्राणुओं पैकी एक शुक्राणू, या स्त्रीबीजाला फलित करतो व एक पेशीय 'गर्भबीज'(Zygote) तयार होते.
ही स्त्री बीज फलनाची प्रक्रिया गर्भाशय नलिकेमध्ये होते. तेथून हे फलित बीज गर्भाशयाच्या पोकळीत पोहोचवण्याचे काम गर्भाशय नलिकेच्या विशिष्ट हालचाली आणि नलिकेत आतील बाजूस असणाऱ्या केसांसारख्या तंतूंमुळे सुलभ होते.
स्वीडनच्या काही शास्त्रज्ञांचे संशोधन सांगते की, त्या एकमेव विजय शुक्राणू व्यतिरिक्त उर्वरित शुक्राणू स्त्रीबीजा भोवती गोळा झालेले असतात, ते या गर्भ बीजाला गर्भाशयात पोहोचण्यासाठी मदत करतात.
गर्भबीजामध्ये पुरुष बीज (शुक्राणू) आणि स्त्रीबीज एकत्र येऊन गुणसूत्रांच्या २३ जोड्या (एकूण ४६ गुणसूत्रे) तयार होतात. एक नवीन जीव अस्तित्वात येतो. त्या एकपेशीय जीवामध्ये मातापित्यांचे गुणधर्म जीन्स च्या रूपाने एकत्र आलेले असतात. या जीन्सचे कार्यकारीत्व त्यावर नियंत्रण करणारे घटक आणि गर्भ संस्कारांमध्ये त्यांचे महत्त्व या विषयीची माहिती पुन्हा प्रसारित करू.
(क्रमशः..)
ही लेखमाला आपल्याला आवडत असेल तर कृपया Like करा, आपल्या मित्र-मैत्रीणींना, व ज्यांना याचा उपयोग किंवा गरज असेल, किंवा यात रस / कुतूहल असेल अशांना जरूर share करा, आवर्जून प्रतिक्रिया द्या आणि पेजवर 'Reviews' मध्ये comment नक्की करा.
धन्यवाद
संकलन -- गोरक्ष मोहिते पाटील. बारामती
0 Comments