Ticker

6/recent/ticker-posts

तरवड , नवरात्रीमध्ये अनन्य महत्व असणारी वनस्पती


(तरवड जातीत उपजाती 380 आहेत या लेखात  तरवडाचे गुण सांगीतले ती तरवड फोटोत निट पारख करुन घ्यावी.नवरात्रीत देवीस जी फुलांची माळ घालतो ती तरवड उपयोगी जाणावी) 



वात, पीत्त, कफ, नाडी संतुलनाला फार महत्त्व आहे.

आवर्तकीलाच आपण तरवड म्हणतो.

कुठं देवतरवड म्हनतात.(तरोटा कींवा टाकळा हा नव्हे)

ऐक ते तीन मिटर उंचीचे पिवळ्यारंगाचे फुल असलेले 10 ते 20 बीया असणारी शेंग हे झाड चामड्याला रंग देण्यास वापरतात .

सालीत टॕनीन 25% चहासारखे असते.

गुण -लघु ,रुक्ष ,कषाय ,तिक्त ,शीत स्तंभन ,कृमीघ्न ,कफपीत्तशामक. 



अंगावर पांढरी धुपणीसाठी जांस्वद फुल गुडमार व तरवड फुले उपयोगी . 



स्वानुभव -तरवड साल डाळींब साल व आवळा साल तीनही समप्रमाणात कुटुन याचा चहा (पाण्यात उकळुन चहाप्रमाने साखर टाकली तरी चालेल)दोन वेळा नियमीत पीणे पीत्तवीकार हळुहळु बरा होतो . सोबत अॕम्लोविन वटि व बाळहीरडा अल्सर असेल तर बेलपान व हराळी टाकावी. 


टिप -तेलकट ,तिखट ,मटन ,अंडी काॕफी ,चहा ,तुरदाळ ,जड अन्न वर्ज .

आवर्तकी विषयी काही संदर्भ बघुया 


तरवड — यास लॅटिनमध्यें कासिया ऑरिक्युलाटा, मराठींत तरवड, संस्कृतमध्यें शरपुष्प, अबुर व देशी भाषेंत चांभारआवळीं अशीं नांवें आहेत. तरवडाच्या जातींत बर्‍याच वनस्पती, झुडुपें झाडें यांचा समावेश होतो. त्याच्या सुमारें ३८० उपजाती आहेत, व त्यांची वाढ उष्ण प्रदेशांतून होते. हिंदुस्थानांत १८ उपजाती आढळतात. त्यांचीं फुलें सुंदर असतात व त्यांचा उपयोग औषधी कामाकरितां व कातडीं रंगविण्याकडे केला जातो. 


क्षेत्र — तरवडाचें झुडुप उंच असून राजपुतान्याच्या दक्षिणेकडील मध्यहिंदुस्थान, दक्षिणहिंदुस्थान व ब्रह्मदेशाच्या कांहीं भागांतून पुष्कळ उगवतें. खडकाळ टेंकड्यांवरून व काळ्या जमिनींतहि त्यांची वाढ होते. 


उपयोग — कातडी कमाविण्यास याच्या सालींचा उपयोग करितात. सालींतील कातडीं कमविण्याचें द्रव्य फार कमी दर्जांचें आहे असें प्रोफेसर ह्यूमेल व प्रॉक्टर यांच्या शोधांवरून सिद्ध झालें आहे. मद्रासच्या उत्तरेकडील भागांतून तिळाचें तेल काढतांना तरवडाची साल किंवा थोडा डिंक त्यांत मिसळतात. 

डोळे येऊन पू फार येऊं लागला म्हणजे तरवडाच्या बियांचा औषधासारखा उपयोग करितात. तरवडाचीं पानें थंड पाण्यांत कांहीं तास भिजत घालून जो कषाय होतो तो दाहनाशक आहे. लहान लहान फांद्यांचा दांत स्वच्छ करण्यासाठीं  लोक उपयोग करितात व लोखंडाला पाणी चढविण्यास मुळ्यांचा चांगला उपयोग होतो असें म्हणतात. 

चहाच्या ऐवजीं याच्या पानांचा काढा पितात .

तरवडाचें झाड साधारण तीन चार हात उंच वाढतें. याचीं पानें टाकळ्याच्या पानासारखीं असतात. यास पिंवळ्या रंगाचे फुलांचे घोंस येतात. याच्या शेंगा चापट असून टीचभर लांब असतात. साल काढल्यानंतर राहिलेलीं लांकडें सर्पणास उपयोगीं पडतात. 


उपजाती, 

(१) कासिया अ‍ॅबसस्:— चकसु, चिमर अथवा चितोल आणि बानार हीं याला इतर नांवें आहेत. ही वनस्पति सर्व हिंदुस्थानभर विपुल आढळते. जुलाबाकरितां व डोळे आल्यावर याच्या बियांचा औषधसारखा उपयोग करितात. 


(२) विलायती आगटी — यालाच कांहीं लोक ददमर्दन असें म्हणतात. हीं झुडपें हिंदुस्थानांतील बगीच्यांतून आढळतात. वेस्टइंडीज बेटांतून हीं झुडपें पहिल्यानें इकडे आलीं. गजकर्ण व नायटे यांवर याचीं पानें व्हॅसलीनमध्यें खलून लावितात. 


(३) भुईतरवड:— याला कधीं कधीं देशी सेन्ना, जमेका सेन्ना व इटालिअन सेन्ना असें म्हणतात. हिंदुस्थानाच्या बहुतेक सर्व भागांतून याचीं रोपें आढळतात. बाजारांत हलक्या प्रतीचा सेन्ना म्हणून भुईतरवडच विकतात. 


(४) कासिया ऑक्सीडेंट्यालिस — यालाचा निग्रो कॉफी, कसोंडी, कसुंदा, हिकल, कलका, सुंद असें म्हणतात. हें एक लहान झुडुप असून सर्व हिंदुस्थानभर ओसाड जागेंत व रस्त्याच्या बाजूला हें पुष्कळ जागीं आढळतें. हें आरंभीं अमेरिकेंतून इकडे आलें असावें. या झुडपाचीं पानें. मुळ्या व बिया औषधी आहेत. बिंयाची पूड करून कॉफीच्या ऐवजीं वापरतात. त्या पित्तहारक आहेत. 


(५) जंगली टाकळा:- कासिया सोफेरा, काळी कसोंदा, काळकसोंदा, बनर हीं त्याचीं इतर नांवें आहेत. उष्ण कटिबंधांतून व सर्व हिंदुस्थानभर टाकळा आढळतो. टाकळ्याच्या बिया, साली व पानें रेचक असून गजकर्णाला पानांचा रस काढून लावितात. या खेरीज तरोटा, बाहवा व सोनामुखी हीं याच जातींत मोडतात.(संग्रहीत) 


वर्णन - १ ते ३ मिटर उंचीचे पिवळ्या फुलांचे , १० ते २० बिया असणारी शेंग देणारे हे झाड चामड्याला रंग देण्यास उपयोगी पडते . महाराष्ट्र , गुजराथ , राजस्थान , दक्षिण भारत व लंका यात होते . सालीत २५ टक्के टॅनिन असते . गुणकर्म लघु , रूक्ष , कषाय , तिक्त , शीत , कफपित्तशामक , स्तंभन , कृमिघ्न , मूत्रसंग्रहणीय , शुक्रस्तंभन ( फुले ) गर्भाशय स्राव कमी करणारी ( पंचांगाने ) शिवाय कुष्ठघ्नी आहे . या गुणकर्माने ती व्रण व नेत्राभिष्यंदात बाहेरून लेपार्थ वापरतात . अतिसार , प्रवाहिका , कृमी , रक्तस्त्राव , प्रमेह ( फुले वा बिया ) प्रदर व त्वग्रोगात उपयोगी पडतात . 

मात्रा - सालीचा काढा ६० ते १०० मि . लि . , फुलांचा रस १२ ते २४ मि . लि . , बियांचे चूर्ण २ ते ४ ग्रॅम . 

स्रोतोगामित्व - दोष - कफघ्न पित्तघ्न धातु - शुक्र ( स्तंभन फुले ) , रक्त ( कुष्ठघ्न ) , रक्त ( स्तंभन ) रक्त ( रक्तपित्तघ्नी ) पुरीष ( अतिसार , प्रवाहिका , कृमि ) ( रक्तातिसारघ्नी ) मूत्र - प्रमेहघ्न ( बिया व फुले ) अवयव गर्भाशय ( प्रदरघ्नी ) नेत्र ( अभिष्यंदात बाह्योपयोग ) 

संदर्भ - द्रवगुणविज्ञान प्रा.गोगटे सर

भुईतरवड 

भुईतरवडांत पानावरून दोन तीन प्रकार आहेत . एकाची पाने टाकळ्या सारखी असतात , व दुसऱ्या जातीची लांबट असतात . लांबट पानाच्या जातीस सोनामुखी ' असे म्हणतात . ही झाडे जमिनीबरोबर वेलासारखी पसरतात . यास चापट शेंगा येतात . भुईतरवड रेचक आहे . 

भुईतरवड - हा कडू , तिखट , अग्निदीपक , मृदु रेचक , देहशोधक ; आणि कृमिनाशक असून , उदर , आनाह , कुष्ट , शिबी , सूज , आम , शूल , दुर्गध , विष , गुल्म , खोकला , ज्वर व वायु यांचा नाश करितो .

मूळ - तुरट , वर्णकर , अमिदीपक , पाककाळी स्वादु ; व यकृत् , कुष्ट , धातुक्षय , वायु व कृमि यांचा नाश करितें .

रक्ततरवड- ( बंदरी सोनामुखी ; फुलें व पाने तांबडी असतात तो ) - तुरट , शीत , आंबट , कडू , सारक , भेदक ; व गुल्म , शोथ , अतिसार , पित्त , विष , त्रिदोष , कुष्ट , ज्वर , श्वास , आनाह , कृमि , रक्तरोग , तृषा , दाह व उदर यांचा नाश करितो . 

याची फुले - कांतिकर व मेह नाशक आहेत . 

याची कोवळी फळे- रुचिकर , दुर्जर , तुरट ; व वांती , कृमि , तृषा , मेह व नेत्ररोग यांचा नाश करितात . याच्या फळांचें बीज - रक्तातिसार , विष व मधुमेह यांचा नाश करिते . 

याचे मूळ- उष्ण , मधुर ; व शुक्रक्षय , रक्तपित्त , श्वास व मेह यांचा नाश करितें . 

( १ ) रेच होण्यास- तरवडाचा पाला रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी कोळून , गाळून , गूळ घालून प्यावा ; म्हणजे मूत्ररेच व रेचहोऊन कोळ्यांतील गर्मी निघून जाते . अथवा पाल्याचा काढाही करून घ्यावा म्हणजे रेच होतात . 

( २ ) कानठळ्या बसल्या असतां त्यावर - तरवडाचे चूर्ण एक मासा , गरम पाण्यात घ्यावे . 

( ३ ) गजकर्णावर- तरवडाचे बी व बाहव्याच्या शेंगेतला गीर दह्यांत वाटून लेप करीत जावा . 

( ४ ) घाम फार येत असल्यास तरवडाची भुकटी अर्धा तोळा , गाईच्या ताकांत घालून प्यावी . 

( ५ ) गर्भ धारणास - भुईतरवडाचा पाला सावलीत वाळवून चूर्ण करावें , व तें सराट्याच्या पाल्याच्या रसांत अगर साखरेंत द्यावे . दिवस २१. 

( ६ ) पांडुरोगास - भुई तरवडाचे चूर्ण पैसाभार , पिकलेल्या आंब्याच्या रसांतून द्यावे . 

( ७ ) सर्पदंशावर करड्याच्या तेलांत भुईतरवडाचे चूर्ण अर्धा तोळा घालून द्यावे , म्हणजे वांती होऊन विष उतरतें .

( ८ ) अतिसारावर- भुईतरवडाचे चूर्ण ताकाशी प्यावे .(अनुभवा नाही)

( ९ ) शूलावर- भुईतरवडाचे मूळ उष्णोदकांतून द्यावें . 

( १० ) स्तनरोगावर ( स्तनास खांडक होते त्यावर ) - भुईतरवडाचे मूळ उगाळून लावावें .

( ११ ) कष्टसाध्य त्वग्दोषावर चूर्ण- भुईतरवड रात्री गोमूत्रात भिजू घालून सकाळी सुकवावें . याप्रमाणे त्यास दहा दिवस भावना देऊन चूर्ण करावे . हे चूर्ण सहा माशांपासून एक तोळ्यापर्यंत ऊन पाण्यातून द्यावें .

संदर्भ -वनौषधी गुणादर्श.

" हिंदुस्थानात प्राचीन काळी प्रत्येक विषयावर ग्रंथ लिहिले गेले आहेत . आज त्या ग्रंथांचा अंशही आपणास पाहावयास मिळत नाही . इंग्रजांचे राज्य असल्यामुळे व त्यांची विद्या राजमान्यता मिळाल्यामुळे विकास पावत आहे . आणि त्यामुळे आमच्या पूर्वजांचे कित्येक ग्रंथ त्याचप्रमाणे नाना तर्हेची विद्या नष्ट होत आहे . 

कष्टं शिष्टक्षतिकृति कलौ कार्यमृच्छन्ति विद्या । ” असे उद्वेगजनक वाक्य कित्येक लोकांच्या मुखांतून बाहेर पडत आहे याचे कारण हेच आहे . याकरिता आमच्या सुशिक्षित वर्गाने , ज्यांची बुद्धी विशाल आहे , ज्यांना ईश्वराने अनुकूलता दिली आहे , अशा सद्गृहस्थांनी या उद्वेगजनक गोष्टीचा नाश होण्यासाठी प्रयत्न करण्याची फार आवश्यकता आहे . 

" -शंकर दाजीशास्त्री पदे [ इ . स . १८ ९ ३ साली लिहिलेल्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून ]

टिप-

माहीती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.

आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.


Post a Comment

0 Comments