!!! २० : तळबीडचे मोहिते : संक्षिप्त कुलवृत्तांत !!! लेखक व संकलक - भाऊ मोहिते, ०७ मार्च २०२१.
जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासाची पानं चाळली जातात तेव्हा त्या इतिहासात काही घराण्यांची अशी पानं सापडतात की ज्यांच्याबद्दल नेहमीच अभिमान वाटत राहतो आणि राहील . त्यातलंच एक घराणं म्हणजेच तळबीडचे मोहिते घराणं होय . खरंतर आपण एकदा लोकशाही स्विकारल्यानंतर घराणेशाहीवर ही पोस्ट लिहून मोहित्याबद्दल कोणताही बडेजाव मिरवायचा नसून फक्त उपलब्ध कागद पत्रानुसार तळबीडच्या मोहिते कुळासंबंधित संक्षिप्त माहिती देण्याचा एक अल्पसा प्रयत्न आहे .
उगम (मूळ) स्थान :
इ .स १५०० -१६०० पूर्व किंवा त्या दरम्यान त्यावेळच्या असलेल्या दिल्ली तख्ताखाली, किंवा दक्षिणेतील वेगवेगळ्या शाहीमध्ये (उत्तरेकडचे आणि मुख्यतः आत्ताच्या राजस्थानातील मूळ असलेले) काही लढवय्ये हिंदू सरदार होते. तसेच या लढवय्यामध्ये ,"मोहिते" सुद्धा एक लढवय्ये सरदार म्हणून दिल्ली ,अहमदनगर आणि बेदर या राजवटीत नावारुपास होते . त्याची इतिहासकालीन कागदपत्रात नोंद आहेच.पण इतिहाससंशोधक वि. का. राजवाडेंच्या मते तळबीडचे मोहिते हे मूलतः राजस्थानमधील मेणापुरी या गावचे चौहान होते, तर पारसनीस यांच्या मते मोहिते हे हाडोती प्रांतातील चौहान आहेत. असेच व यापुढे जाऊन, १५६५ मधील विजयनगर साम्राज्यासाठी झालेल्या राक्षस तागडीच्या उर्फ तालिकोटच्या युद्धसमयी नावास आलेल्या रंगोजी (रंगराव) चौहान यांचे आणि मोहिते यांच्यासंदर्भात पारसनीसांनी त्यांचे मत नमूद केलं आहे. राजवडेंप्रमाणे तळबीडमध्ये ही परपंरागत मौखिकरित्या याच मेणापुरीचा संदर्भ दिला जात असे.
आडनाव /किताब /उपपद/पदवी/उपाधी :
मोहिते : पारसनीस यांच्यामते मोहिते हा एक किताब असून तो अरबी भाषेतील शब्द असून त्याची उत्पत्ती मोहीम या शब्दा पासून झाली आहे व त्याचा अर्थ "विजयी" किंवा "रण जिंकणारा "असा होतो , आणि तसेच ते या कुळीबद्दल दोन फारसी तवारीखमध्येही संदर्भ असल्याचा दाखला दिला आहे.
बाजी : इतिहासाचार्य वि का राजवाडे यांच्या , इतिहास आणि ऐतिहासिक या लेखमालेतील अंक ३७ मध्ये तळबीडच्या रतोजी मोहिते (मुळपुरुष तुकोजी राजे मोहिते यांचे वडील ) यांना अहमदनगरच्या मोर्तिजा निजामशहा याने लढाईतल्या चांगल्या कामगिरीबद्दल "बाजी" हा किताब दिला आहे ( बाजी =मानी बाजू किंवा भुज) असा उल्लेख केला आहे आणि त्याचा उल्लेख त्यावेळच्या काही पत्र व्यवहारातून बाजी-मोहिते असा ही आहे .
हंबीरराव : या किताबाचा संदर्भ शिवपूर्वकालीन कागदपत्रात मोहिते या "आडनावा" संबंधित आढळतो आणि शिवकालात फक्त तो एकदा "नावा" संदर्भात आढळतो. शिवपूर्वकालापूर्वी शहाजहानच्या काही पत्रात "मोहिते हंबीरराव" असा आणि मुख्यतः तो बागलाणच्या मोहिते संदर्भात आढळतो (भिकुजी मोहिते , हंबीरराव आणि त्यांचा मुलगा एल्होजी भिकुजी मोहिते,हंबीरराव). तसेच मलिक अंबरच्या कारकिर्दीत आणि त्याच्या सोबत असलेल्या विठ्ठलराज याचा उल्लेख "विठ्ठलराज चौहान, हंबीरराव" आणि त्याच्या मुलाचा "खेलोजी चौहान , हंबीरराव" म्हणून असा उल्लेख आढळतो. तर नेवासे येथील विठोजी यांचा "विठोजी मोहिते, हंबीरराव (नेवासकर)", व त्यांचा मुलगा "संभाजी मोहिते ,आमीरराव (हंबीरराव) नेवासकर "असा आढळतो. नक्कीच , याचा अर्थ असा होतो की शिवाजी महाराजापूर्वी हा किताब अस्तित्वात होता आणि तो मोहिते या आडनावानंतर उपपद म्हणून लावले जाई. याचा उल्लेख शेडगावकार बखरीमध्ये प्रतापसिंह यांनी दिलेल्या रकमेच्या यादीत दिसतो आणि त्यातील मोहिते आडनावानंतर हे हंबीरराव उपपद सोबत त्यांच्या गावाचा उल्लेख ही केला आहे. उदा .टणूकर,आरफळेकर, गोवेकर इ. तर शिवकालात हंबीरराव हा किताब फक्त एकदा तळबीडच्या पराक्रमी आणि पंचहजारी (स्वतःचं ५००० घोडदळ) असलेल्या हंसाजी मोहिते यांना ८ एप्रिल १६७४ रोजी देण्यात आला आहे आणि तेव्हा "हंसाजी"चे किताबी नाव "हंबीरराव" मोहिते झाले ( हंसाजी मोहिते, हंबीरराव असं नाही). तसेच तळबीड मधील नंतरच्या एका वाटणीत (महजर मध्ये) तिघा भावांचा हरिफराऊ, हंबीरराव व शंकराजी असा उल्लेख आढळतो.
आजकाल अनेकजण उपपद आणि किताबी नावाची गल्लत करून सरसेनापती हंबीरराव मोहिते हे आमचेच आणि आमच्याच भूमीतले म्हणून प्रदर्शन मांडू लागले आहेत. खरं तर पराक्रमी लोकांना अशा चौकटीत मांडून आपण त्यांना खुजे करण्यापेक्षा त्यांच्या नावाला साजेल अशी कामगिरी करणं अतिशय योग्य होईल. नक्कीच तळबीडकरानीं याचा आदर्श इतरापुढं काही काळ सैन्यात आणि आझाद हिंदसेनेत जाऊन आणि ठशीव कामं करून ठेवला आहे.
राजे : एकंदरीत तळबीडच्या मोहित्यांचा शिवपूर्वकालापासूनचा पत्रव्यवहार बघितला असता त्यांच्या मूळपुरुषापासून सर्वांना राजे ही उपाधी आहे (तुकोजी राजे, संभाजी राजे, धारोजी राजे ) तर ग्रांट डफ आणि इतर संशोधकांच्या लेखांतूनही अप्रत्यक्षारित्या यास आधार मिळतो, कारण शिवपूर्वकालापूर्वी "निरा ते वारणा यामधील भागावर पूर्णतः मोहिते ,महामुलकर,गुजर,शिर्के आणि महाडिक यांचा ताबा होता", म्हणजेच ते त्या भागाचे राजे होते आणि म्हणून ते उपाधी लावत असावेत. काही पत्रात तसा उल्लेख ही आहे.त्यावेळी त्यांच्याशी मुकाबला करून त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी युसुफ आदिलशहा याने कर्नाटकाहून मोरे यांना पाठविले आणि ते जावळीला स्थायिक झाले आणि त्यांनी आपला या खोऱ्यात जम बसविला .नंतर शिवकालात त्यांचं काय झाले हे सर्वश्रुत आहे.
तळबीड मधील प्रवेश व कायम स्वरूपी तळ :
वि. का.राजवाडे यांच्या मते त्यावेळी तळबीड हे गाव चव्हाण यांच्याकडे होतं. चव्हाण आणि डोमुगडे (चंदूगडे) यांच्यातील पाटीलकीच्या वादातील न्यायनिवड्यासाठी , तळबीडच्या चव्हाणानी , बेदर मुक्कामी आणि सरदार असलेल्या तुकोजीराजे मोहित्यांना जेव्हा ते पन्हाळ्यास आले असता त्यांना या न्यायनिवाड्यासाठी विनंती केली. आणि याचा परिपाक म्हणून त्यांना बेदरहून पाटीलकी करावयास विनंती केली.त्यानंतर नेमस्तांनी तळबीडमध्ये केलेल्या उपद्दव्यापानी आणि षड्यत्रांनी त्यांना तळबीड मुक्कामी यावे लागले . कालांतराने त्यांच्या दोन पराक्रमी पुत्रांनी संभाजी राजे आणि धारोजी राजे यांनी इतिहासात आपलं नाव कोरलं आणि संभाजी राजे यांच्या हंसाजी नामक पुत्राने तर शिवइतिहासात आपलं मानाचं स्थान निर्माण केलं आणि इतिहासात सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणून लौकिकास आले.संभाजी आणि धारोजी राजे जेव्हा बेदरशाहीमध्ये होते तेव्हा आपल्या पराक्रमी वडिलांच्या (तुकोजी राजे ) स्मरणार्थ तळबीडगावी त्यांचा पार बांधला. व पुढील नवव्या आणि दहाव्या पिढीने त्याचा जीर्णोद्धार केला .(या पोस्ट मधील फोटो त्याचाच आहे) आणिआज ही तो सुस्थितीत आहे. संभाजी व धारोजी बंधुनी पुढे (शिवपूर्वकालापूर्वी) आपल्या स्वकर्तृत्वावर इनामं/परगणे मिळवली आहेत.
टीप : तुकोजी राजेंच्या वडीलबंधुचे नाव संभाजी राजे होते आणि ते जावळीस होते. तसेच तुकोजी राजेंच्या ज्येष्ठ मुलाचे नाव सुद्धा संभाजी राजे आहे ( सरसेनापती हंबीररावाचे वडील ). त्याप्रमाणेच सुप्याला सुद्धा एक संभाजी मोहिते, हंबीरराव होते (ज्यांना महाराजांनी अटक केली होती ) .या सर्व नामसाधर्म्यामुळे व काही कागदपत्रात असणाऱ्या आडनावा नंतर येणाऱ्या उपपदामुळे काहीजण सरसेनापतीं हंबीरराव मोहितेच्या बाबतीत खूप मोठी गल्लत करतात.
इनाम /वतनं /फर्मान/सनदा :
एकूण सर्व उपलब्ध पत्र व्यवहार बघितला असता तळबीडमधील मोहित्यांना "तळबीड कर्याती' खाली तळबीड, उरुल, माजगाव, कोरीवळे, मुंढे, वेळफळे (येरफळे ) व "वांगी कर्यातीखाली" २१ गावं इनामी होती. त्याबरोबरच बालाघाट , कऱ्हेपठार इ. होती.वंशपरंपरेनं तळबीड कर्यातीखाली ६ गावा पैकी हरिफराऊ हंबीरराव (हंसाजी), शंकराजी यांच्याकडे तीन गावं आणि दीपोजी, नेतोजी यांचेकडे तीन गावं तर वांगी कर्यात निमेनिम वाटून घेतलं असं वेगवेगळ्या पत्रात उल्लेख आहेत. दोन्ही वंशवेलीतिल (हरिफराऊ व शंकराजी) (दिपोजी व नेतोजी) यांच्या पुढील पिढीत (हंसाजीना ताराबाईशिवाय अपत्य नव्हते )इ. स. १९३९, १९४८ आणि १९५७ च्या " कुळ/कायम कुळ/कसेल त्याची जमीन" कायदा येईपर्यंत सर्व इनामं ताब्यात/अस्तित्वात होती.आणि त्याचे दस्तावेज आजही उपलब्ध आहेत.
आजचे तळबीड मधील असणारे मोहिते हे तुकोजी आणि त्यांचे बंधू संभाजी यांच्या वंशवेलीतील आहेत.तुकोजी वंशवेलीकडॆ देशमुखी अधिक पाटीलकी आणि संभाजी वंशवेलीकडे पाटीलकी होती.
संदर्भ :
१) वि का राजवाडे : इतिहास आणि ऐतिहासिक अंक :२८,२९,३०,३१,३२,३७ व खंड ८ वा.
२) द.बा.पारसनीस :मुसलमानी अमदानींतील मराठे सरदार
३)श. ना. जोशी : शिवकालीन पत्रसार संग्रह खंड १,२ आणि ३
४) पु. वि.मावजी आणि पारसनीस : सनदा पत्रातील माहिती
५) मराठी दफ्तर ,रुमाल पहिला, श्रीमंत महाराज यांची बखर.
६) ग.ह.खरे : ऐतिहासिक फारसी साहित्य ,द्वितीय खंड.
७) C.A. Kincaid : A history of the Maratha people.
८) J.M.Duff : The History of Mahratta
९) J.N.Chowdhary : Malik Ambar ,A Biography Based On Original sourc.
१०) Dr.A.G.Powar : Maratha History Seminar papers (May'28-31,1970)
११) भाडेपट्टे करारनामे : १९३४ -३५, कोर्ट समन्स १९१४.
टीप- लेख हा काॅपी पेस्ट आहे. इतीहासकार व नातेवाईक यांनी शहानिशा करूनच आकलन करावे.. प्रत्येक गावातील वेगवेगळ्या कथा व रुढी परंपरेनुसार मते वेगळे असु शकतात..
0 Comments