*बांबू : कल्पवृक्ष*
समशीतोष्ण ते उष्ण कटिबंधीय हवामान असलेल्या भारतातील सर्व राज्यांत मैदानी व डोंगराळ प्रदेशात बांबू आढळतो. जगात चीनच्या खालोखाल भारतात बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. महाराष्ट्रातील विदर्भ, कोकण क्षेत्रातही आज बांबू लागवडीस फार मोठा बाब आहे. सह्याद्री पर्वतात बांबूच्या विविध जाती आढळतात. *शिवकाळापासून कोकण प्रांतात बांबू उत्पादन घेतले जात आहे. त्या वेळी सैनिक शस्त्र म्हणून भाल्याचा वापर करत. या भाल्यांना लागणारा दांडा हा बांबूचा असे. मोठय़ा प्रमाणावर दांडे उपलब्ध व्हावेत, म्हणून स्वत: शिवाजी महाराजांनीच बांबू लागवडीला प्रोत्साहन दिल्याचे दाखले इतिहासात आढळतात.*
पृथ्वीतलावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून बांबूचे अस्तित्व आहे. वनातील इतर वनस्पतींच्या तुलनेत ठराविक कालावधीमध्ये, ठराविक क्षेत्रात जास्तीत-जास्त बायोमास निर्माण करण्याची क्षमता बांबुमध्ये आहे. जगामध्ये बांबूच्या सुमारे ९० जाती आणि १५०० प्रजाती आहेत. फुलांचा मोसम जातीवर अवलंबून असतो. काहींत ती एक किंवा अधिक वर्षांनंतर येतात, तर काही जातींत ३०-६० वर्षांतून एकदा फुले येतात व फुलल्यानंतर लवकरच वनस्पतींची जीवनयात्रा संपते म्हणजेच ते वाळण्यास सुरवात होते. हे जलद गतीने वाढणारे (दर दिवशी सु. ७-८ सें.मी.पर्यंत) काष्ट गवत आहे. अशा जलद गतीने होणारी वाढ सुमारे एक महिन्यापर्यंतच होत असते. इतर गवतांप्रमाणे बांबूंच्या जमिनीतील खोडाच्या भरपूर वाढीमुळे त्यांची लहानमोठी बेटे बनतात आणि प्रत्येक बेटात सु १०-१२ वायवी खोडे बनतात. या खोडांवर पडलेल्या वर्तुळाकार कंगोऱ्यांमुळे फांडी व पेरी स्पष्ट दिसतात. मुख्य खोडाच्या कोवळ्या कांडयाभोवती असलेले आवरक व पाने धारण करणाऱ्या लहान डहाळ्यांवरचे आवरक यांत फरक असतो. वायवी खोडे कधी फार लहान तर कधीकधी ३-३५ मी. पर्यंत उंच वाढतात व काहींचा व्यास २०-३० सें.मी. इतका मोठा असतो. कांडी बव्हंशी पोकळ तर काही जातींत भरीव असतात. पेऱ्याच्या भागात जाड पडदा असतो. फांद्या भरपूर असून खोडे काष्ठमय असतात. पाने साधी, लांबट व अरुंद असून बहुधा पानांना बारीक देठ असतात. काही बांबू काटेरी असतात (उदा. कळक).
प्रजाती :
अखंड पृथ्वीतलावर बांबूच्या सुमारे १४०० प्रजाती आहेत. यातील १४० प्रजाती भारतात आहेत, पैकी ६० प्रजाती या लागवडीखाली आहेत. त्यात *बांबूसा आणि डेंड्रोकॅलॅमस* या २ जाती प्रमुख असून, त्या देशात सर्व ठिकाणी वाढतात. *महाराष्ट्रात मानवेल, कटांग-काटस, कोंड्या मेस, पिवळा बांबू, चिवळी या प्रजाती आहेत; तर कळक, मेज, चिवा, चिवारी, हुडा बांबू, मोठा बांबू, पिवळा बांबू असे लांबी व गोलाई यांवरून बांबूचे प्रकार पडलेले आहेत.*
*मानवेल* - हा प्रकार महाराष्ट्राच्या सगळ्या भागांत आढळतो. त्याची उंची ८ ते १६ मीटरपर्यंत, तर व्यास २ ते ८ सें.मी.पर्यंत असतो. एक पेर ३० ते ४५ सें.मी. लांबीचे असते. बुरुड काम करणारे टोपल्या, सुपे यांसारख्या वस्तूंच्या निर्मितीसाठी या प्रकारचा बांबू वापरतात.
*कटांग, काटस* - या जातीचे बांबू १५ ते ३० मीटर उंच आणि ३ ते ७ सें.मी. व्यासाचे असतात. त्यांचे एक पेर २५ ते ४५ सें.मी. लांबीचे असते. कुंपण व घरबांधणीसाठी याचा उपयोग होतो.
*कोंड्या मेस* - याची उंची १६ ते २३ मीटर, व्यास ८ ते १५ सें.मी. तर पेराची लांबी २० ते ४५ सें.मी. एवढी असते. याचा वापर बारीक विणकाम करण्यासाठी,फर्निचर बनविण्यासाठी करतात.
*पिवळा बांबू* - घरात किंवा बागेत शोभेसाठी लागवड.
*चिवळी* – याची उंची ९ मीटर, व्यास २ ते ४ सें.मी., तर पेर १५ ते ३० सें.मी. लांबीचे असते. टोपल्या व घरबांधणीसाठी या बांबूचा उपयोग करतात.
अमरावती जिल्ह्यात वडाळी येथे बांबूच्या २९ प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे. देशातील हे तिसाव्या क्रमांकाचे संग्रहालय आहे. तर जगातल्या दुर्मीळ व औषधी अशा ६४ प्रजाती रुजवण्याचा प्रयत्न येथे केला जात आहे. बांबूच्या विविध प्रजातींचे संवर्धन करण्यात डेहराडूनचा (उत्तराखंड) पहिला व केरळचा दुसरा क्रमांक लागतो. कोकणात सापडणारा मानगा हा बांबू उंचीने मोठा असतो. अत्यंत मजबूत म्हणून त्याकडे पाहिले जाते. काही वेळा ३० फुटांपर्यंत मानगा वाढतो. घराचे छप्पर, मोठय़ा समारंभाचा मंडप उभारण्यासाठी याचा वापर करतात. हिरवट, तपकिरी कलरच्या या बांबूला आज कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी मोठी मागणी आहे.
*जमीन व हवामान :*
बांबूच्या व्यावसायिक पद्धतीने लागवडीसाठी बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असणे गरजेचे असते पाणथळ जमिनीमध्ये बांबू वाढत नाही. क्षारपड, पानथळ जमिनी बांबूच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.
बांबूला उष्ण व दमट हवामान मानवते आणि जास्त पाऊसमान असलेल्या उष्ण प्रदेशात बांबूची वाढ चांगली होते. तसेच कोरड्या हवामानातही बांबू चांगला वाढतो. पाणी देण्याची सोय असल्यास बांबूची लागवड सर्वसाधारणपणे ८ ते २५ अंश सेल्शिअस तापमान आणि सरासरी प्रति वर्षी ७५० मि.मी. पाऊसमान असणाऱ्या प्रदेशात करावी.
अभिवृद्धी :
रोपवाटिकेत गादी वाफ्यावर किंवा पॉलिथिन पिशव्यांमध्ये बी लावून रोप तयार करून लागवडीसाठी वापरता येतात. पेरणीसाठी बियाण्याला कुठल्याही प्रकारची पूर्वप्रक्रिया करण्याची आवश्यकता नसते; परंतु उधईपासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी पेरणी करताना गादी वाफ्यावर १० टक्के लिंडेन पावडर शिंपडावी. पेरणीनंतर १० दिवसांत बियाण्याची उगवण होते. नवीन बियाण्याची उगवणक्षमता ७० टक्क्यांपर्यंत असते. डब्यात बियाण्याची साठवण केल्यास ८ ते १० महिन्यांपर्यंत बियाणे पेरणीसाठी वापरता येते. बांबूची रोपे तयार करण्यासाठी बियाणे गादी वाफ्यावर पेरावे, त्यासाठी वाफ्याची लांबी उताराच्या आडव्या दिशेने ठेवावी. वाफ्याची रुंदी १ मीटर व लांबी सोयीनुसार १० मीटर ठेवावी. गादी वाफ्यातील अंतर ३० सें.मी. ठेवून आडव्या ओळीमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बियांची पेरणी करावी. ३ ते ४ महिन्यांनी रोपे पॉलिथिन पिशवीत लावावीत. तयार केलेली रोपे जून व जुलै महिन्यांत लागवडीसाठी वापरता येतात. रोपांची निर्मिती ही पॉलिथिन पिशवीत बियाणे लावूनसुद्धा करता येते. यासाठी २५ सें.मी. बाय १२ सें.मी. आकाराच्या पॉलिथिन पिशवीत माती, वाळू व चांगले कुजलेले बारीक शेणखत यांचे १:१:१ मिश्रण करून ते पॉलिथिन पिशवीत भरून, प्रत्येक पिशवीत ३ ते ४ बिया पेरून त्यास पाणी द्यावे. पॉलिथिन पिशव्यांत रोपांची वाढ चांगली होते आणि बियाणे कमी लागते. मुळे न दुखविता पुनर्लागण करावी लागते.
फळांच्या व बियांच्या दुर्मिळतेमुळे नवीन लागवड शाकीय पद्धतीने करतात. बांबूच्या वाढणाऱ्या खोडास कंद असे म्हणतात. एक वर्षाच्या आतील दोन-तीन बांबू काढून लागवडीच्या ठिकाणी जमिनीत गाडून लावावे. जमिनीच्या वर १०-१२ सें.मी. बांबू ठेवून त्यावरील भाग छाटावा. किमान दोन-तीन डोळे असणारा कंद लागवडीकरिता वापरावा. आता उतिसंवर्धन पद्धतीने बांबू लागवड करतात.
*लागवड :*
ज्या ठिकाणी पेरणीसाठी बियाणे उपलब्ध आहे, अशा ठिकाणी मार्च, एप्रिल महिन्यांत पेरणी करावी.
बांबूची लागवड ही साधारणपणे ३ बाय २ मीटर ते ७ बाय ७ मीटर अंतरापर्यंत करण्यात येते. बांबूचे बेट हे प्रत्येक वर्षी येणाऱ्या बांबूंमुळे पसरत असल्याने, त्याचप्रमाणे त्याचा कालावधी ३५-४० वर्षांचा असल्याने जास्त अंतरावर बांबूची लागवड करणे फायदेशीर असते. यात बांबूची वाढही चांगली होते आणि बांबू तोडणीस अडचण येत नाही. सर्वसाधारणपणे ५ बाय ५ मीटर अंतरावर बांबूची लागवड केल्याने एक हेक्टर अंतरावर 1500 बांबूची रोपे बसतात. बांबूची लागवड करण्यासाठी एप्रिल-मे महिन्यात पाच मीटर अंतरावर ६० बाय ६० बाय ६० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. रोपांपासून लागवड करावयाची असल्यास ३० बाय ३० बाय ३० सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. कंद लागवडीसाठी जर कंदाचा आकार मोठा असेल, तर त्यानुसार खड्ड्याचा आकार वाढवावा. अशा या खोदलेल्या खड्ड्यांत पावसाळ्यापूर्वी माती भरावी. माती भरताना त्यामध्ये एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम अमोनिअम सल्फेट आणि २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट मिसळावे. नंतर पुरेसा पाऊस होताच त्या ठिकाणी बांबूची लागवड करावी. खड्ड्यांमध्ये कंद, पॉलिथिन पिशवीत वाढलेली रोपे किंवा गादीवाफ्यावर वाढविलेली रोपे रोपांच्या मुळांना इजा होणार नाही, अशा तऱ्हेने मातीसह काढून लावावीत. बांबूस पाणथळ जमीन चालत नाही, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.
अन्नद्रव्ये व पाणी व्यवस्थापन :. बांबू खतांना चांगला प्रतिसाद देतात, असे आढळून आलेले आहे.
साधारणपणे ७५० ते ८०० मि.मी. पाऊस पडत असलेल्या ठिकाणी बांबूस पाणी देण्याची गरज भासत नाही, तरीही बांबू रोपांची पावसाळ्यात लागवड झाल्यानंतर पहिल्या दोन वर्षी डिसेंबर ते मे महिन्यात लागवडीस पाणी द्यावे.. हलक्या व मुरमाड जमिनीत एक आठवड्याच्या अंतराने, तर मध्यम व भारी जमिनीत १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एक ते दोन वर्षांनंतर बांबूस पाणी देण्याची गरज पडत नाही.
लागवडीनंतर निगा :
लागवड झाल्यावर प्रथम वर्षी महिन्यातून एकदा नियमितपणे रोपांना मातीची भर द्यावी. यामुळे कंद जोमाने वाढण्यास मदत होते. भर देण्याचे काम लागवडीपासून तीन वर्षांपर्यंत करावे. बांबू जमिनीतल्या मूळ खोडापासून वाढतात. त्यामुळे खोडापासून प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नवीन कोंब फुटतात. ज्या दिशेस कोंब फुटतात, त्याला "चाल' म्हणतात.
बांबू या वृक्षाची वर्षभर सर्व काळात वाढ होत असल्याने जमिनीत योग्य ओलावा राहील यासाठी काळजी घ्यावी. यासाठी रोपांच्या जवळ असलेल्या गवताचा, धसकटाचा आच्छादन म्हणून उपयोग केल्यास ओलावा टिकून राहण्यास मदत होते आणि कालांतराने त्याचा खत म्हणूनसुद्धा उपयोग होतो. मोकाट जनावरे, वन्यप्राणी आणि आगीपासून संरक्षण करावे.
तण व्यवस्थापन :
बांबू ही गवत प्रकारातील वनस्पती असल्याने यांची मुळे साधारणतः जमिनीच्या वरच्या थरातच असतात, तसेच तण आणि झुडपे यांचीही मुळे वरच्या थरात असल्यामुळे पाणी व अन्न मिळविण्यासाठी दोन्हीची स्पर्धा होते, त्यामुळे वेळोवेळी रोपांभोवतालचे तण काढणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे रोपांच्या सभोवतालची माती भुसभुशीत राहिल्यास खोडमुळाची वाढ जोमदार होते.
छाटणी :
प्रत्येक कळकाच्या पेऱ्यामध्ये फांद्या फुटत असतात व कधीकधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. या फांद्यांचा नवीन येणाऱ्या कळकाच्या सरळ वाढीला अडथळा होऊन कळक वेडावाकडा वाढू नये म्हणून त्यांची छाटणी करणे आवश्यक ठरते, त्यासाठी फांद्यांची छाटणी कळकाच्या अंगालगत धारदार कात्रीने खालपासून जिथपर्यंत करता येईल तिथपर्यंत करावी.
आंतरपिके :
बांबू लागवडीनंतर तीन ते चार वर्षांनी पक्व होण्यास सुरवात होते, तेव्हा सुरवातीच्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीमध्ये दोन ओळींच्या पट्ट्यात मूग, उडीद, कुळीथ व सोयाबीनसारखी आंतरपिके घेण्यास हरकत नाही, त्यामुळे अधिक उत्पन्न मिळतेच, शिवाय जमीन तणविरहित राहण्यास मदत होते.
काढणी व उत्पन्न :
कंदांपासून लागवड केल्यास चार ते पाच वर्षांपासून उत्पादनास सुरवात होते. बांबूची लागवड जर रोपांपासून केली, तर सहा ते आठ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. कोंबातून बाहेर पडणारा बांबू पूर्णपणे वाढून बेटातील अगोदरच्या बांबूच्या आकाराएवढा झाला असेल, तर जुना बांबू तोडावा. बांबू कापताना तो जमिनीलगत न तोडावा, दुसऱ्या व तिसऱ्या पेऱ्याच्या मध्यभागी (३० सें.मी. अंतरावर) धारदार कुऱ्हाडीने घाव घालून तोडावा. असे न केल्यास खोडमुळाच्या आतील पेशींना बाहेरचे पाणी लागून ते सडते व बांबूचे खोडमूळच मरते. बांबू योग्य ठिकाणी तोडल्यास कुजण्यापासून त्याचे संरक्षण होते.
बांबू कापणीबाबत नियम :
१. अविकसित रांजीतून बांबू तोडू नये. ज्या रांजीत दहापेक्षा कमी कळक असतात, त्यांस अविकसित रांजी समजतात.
२. वाढीच्या काळात १५ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत बांबूची कापणी करू नये.
३. दोन वर्षांपेक्षा कमी वयाचे बांबू तोडू नयेत.
४. अर्धवट तुटलेले, वेडेवाकडे, मेलेले कळक प्रथम तोडावे.
५. प्रत्येक नवीन कळक आणि कोवळ्या कळकांना आधार देण्यासाठी आणि भविष्य काळाच्या दृष्टीने प्रत्येक कोवळ्या कळकासाठी दोन या प्रमाणात कमीत कमी आठ प्रौढ कळक प्रत्येक रांजीत सोडलेच पाहिजेत.
मूळ खोड उघडे पडू नये किंवा त्यास कुठलीही इजा पोचू नये, यासाठी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी :
१. रांजीत राखून ठेवलेले कळक हे रांजीत सारख्या अंतरावर राहतील, या दृष्टीने तोड केली पाहिजे.
२. कळकांच्या जमिनी लगतच्या पहिल्या कांड्यावर व जमिनीपासून १५ सें.मी. उंचीवर आणि जास्तीत जास्त ४५ सें.मी. उंचीपर्यंत कळक तोडला पाहिजे.
३. तोड ही अत्यंत तीक्ष्ण धारेच्या पात्याने केली पाहिजे. त्याकरिता विशेष प्रकारे तयार केलेले बांबू कापणी विळे वापरावेत.
४. तोडीनंतर सर्व काडीकचरा रांजीपासून दूर केलाच पाहिजे. त्यामुळे कीटक व वणव्यापासून बांबूवनास धोका राहणार नाही.
लागवड पद्धती व योग्य व्यवस्थापन यावर मुख्यत्वे बांबूचे उत्पादन अवलंबून असते. 3 बाय 2 मीटर अंतरावर लागवड केल्यास प्रति हेक्टरी 1500 रोपे बसतात व त्यामधून चौथ्या वर्षी 6000 बांबू मिळतात. बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडून प्रति नगास 50 रुपये भाव धरला तरी एकूण 3 लाखापेक्षा जास्त रुपये उत्पन्न प्रति हेक्टरी मिळण्यास सुरवात होते. बांबूची एकदा लागवड केल्यानंतर सलग ४० वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. शिवाय दरवर्षी बांबूचे उत्पन्न १० ते १५ टक्क्यांनी वाढत जाते. हलक्या जमिनीत तसेच प्रतिकूल वातावरणात देखील सहाव्या वर्षापासून २ इंच व्यासाचे व १८ फूट लांबीचे बांबू मिळतात.
उपयोग :
बांबूचे जवळपास ५,००० उपयोग सांगितले जातात काही उपयोग खालीलप्रमाणे –
१. पारंपारिक : सुपे, टोपली, जात्यासाठी खुंटा, शिडी इत्यादी.
२. शेतीसाठी : शेतीची अवजारे, टिकाव, फावड्याचे दांडे बनवण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी, मुसके, पेरणी, द्राक्ष, टोमॅटोसाठी आधार इ.
३. घरगुती वापर : टोपल्या, सुपण्या, चाळणी, तट्टे, कणग्या इ.
४. प्रवासाचे साधन : बैलगाडी, होडी, तराफा, नावा इ.
५. घरबांधणी : झोपडीसाठी, पार्टीशनसाठी, दरवाजे, छत इ.
६. फर्निचर : टेबल, खुर्च्या, टिपॉय, आराम खुर्च्या बनविण्यासाठी.
७. हस्तकाल व कलाकुसर : विणलेल्या शोभेच्या वस्तु, विविध आभुषणे, फ्रेन्स इ.
८. व्यापार : चहाची खोकी, टोपल्याम आंबा पॅकींगसाठी पेट्या बनवण्यासाठी, पडदे, बासरी बनवणे, नॅपकिन्स, पॉलिहाऊस, कागद बनवणे, उदबत्ती इ.
९. आयुधे : भाला, धनुष्य बाण, लाठी इ.
१०. औषधे : वंशलोशन, नारू रोगावर औषधांसाठी
११. मृदा संधारण : जमिनीची धूप थांबविणेसाठी, जमिनीचा कस वाढविणेसाठी.
ग्रामीण व शहरी लोकांचे जीवनमान उंचावण्याची फार मोठी क्षमता या बांबूमध्ये आहे. सध्या बांबूचा जागतिक व्यापार जवळपास ६०,००० कोटी रुपयाचा असून त्यात चीनचा वाटा ५०% आहे. सन २०२० पर्यंत हा व्यापार म्हणजे पाचपटीने वाढेल असा अंदाज आहे. कागद कारखाना, कुटीरउद्योग व हस्तशिल्प कामासाठी बांबूपासून कच्चा माल मिळतो. घरबांधणी, शेती अवजारे तसेच घरसजावटीच्या कित्येक वस्तुंसाठी बांबूचा उपयोग करण्यात येतो. एवढे काय तर बांबूच्या कोवळ्या कोंबांपासून चांगली भाजी तसेच लोणचेही तयार करतात, बांबूची मुळे, रस खोडावर आढळणारी पांढरी भुकटी यांचा फार प्राचीन काळापासून छोट्या मोठ्या आजारात औषध म्हणून वापर केला जात आहे. तसेच बांबूचे माणसाच्या सामाजिक व आर्थिक जीवनातील विविध उपयोग लक्षात घेत बांबू एक कल्पवृक्ष ही ओळख सार्थ वाटते. त्यामुळे पाण्याची सोय असल्यास कमीत कमी मजुरांची गरज असणारे आणि दीर्घकाळ उत्पादन देणारे बांबूचे पीक घ्यायला काहीच हरकत नाही.
राष्ट्रीय बांबू मिशन योजना २००७ मध्ये हाती घेण्यात आली. ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व डोंगमाथ्यावरील मातीची धूप रोखण्यासाठी आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना हाती घेण्यात आली. बांबू वाहतूक व तोडणीसाठी वनखात्याच्या जाचक अटीतून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. मात्र बांबू वाहतुकीसाठी स्थानिकपातळीवरील गावकामगार पोलिस पाटील किंवा तलाठी दाखल्याची आवश्यकता लागणार आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी स्वमालकीच्या जागेत केलेल्या बांबूची तोडणी करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. याचा अध्यादेश जून २०१५ मध्ये निघाला आहे. वाहतुकीला मिळालेल्या परवानगीमुळे बांबू लागवडीला अधिक चालना मिळणार आहे.
(वरिल सर्व माहिती राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्रे आणि कृषि विद्यापीठांनी केलेल्या शिफारसीवर आधारित आहे. प्रादेशिक हवामान व इतर नैसर्गिक साधनसामुग्रीतील वैविध्यामुळे या शिफारसींची परिणामकारकता विविध भागात भिन्न असू शकते.) *लागवडीसाठी संपर्क* गोरक्ष मोहिते - 8459948301
0 Comments